जव्हार प्रतिनिधी,
साखरशेत येथे सुरू असलेल्या शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्गाचा समारोप,
पालघर जिल्ह्यातील केंद्रशाळा साखरशेत न.१ येथे गेले १० दिवस सुरू असलेल्या शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारंभ काल पार पडला. सदर उपक्रम जि.प.शाळा साखरशेत १,ता. जव्हार येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जव्हार करिश्मा नायर (आय.ए. एस.),पंचायत समिती जव्हार सभापती विजयाताई लाहरे, उपसभापती दिलीप पाडवी, आणि साखरशेत ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता चौधरी इ.मान्यवर उपस्थित होते.या
प्रशिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले,ज्याचे प्रात्यक्षिक उपस्थित मान्यवरांसमोर सादर करण्यात आले.प्रशिक्षक शरद पाटील ( संभाजीनगर, औरंगाबाद,) यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
उद्घाटन प्रसंगी सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरते.विक्रमगडचे आ. हरिश्चंद्र भोये यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून अशा प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित केले आणि महिला सबलीकरणासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे सांगितले. पंचायत समिती सभापती विजयाताई लाहरे व उपसभापती दिलीप पाडवी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमासाठी साखरशेत केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर भोये,शाळेचे मुख्याध्यापक राजेश गवई,कृष्णा मुरमे, हरिश्चंद्र भोये,मंजुळा भोये,दामू कुवरा,मनोज विशे व शिक्षकानी बहुमोल सहकार्य केले.
शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पहिलाच उपक्रम असून,यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाचे महत्व तसेच ऐतिहासिक शौर्याची जाणीव निर्माण झाली आहे.महिला सबलीकरणासाठी,असे उपक्रम भविष्यातही राबवावेत,अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

