दीपक मोहिते,
भयानक वास्तव,
पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या व बुरशी,
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थांच्या शरीरात क्रयशक्ती वाढावी,त्यांना कुपोषणाची लागण लागू नये,यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही दशकापूर्वी पोषण आहार योजना सुरू केली.पण शिक्षण विभागाचे अधिकारी व पुरवठादार यांच्या मिलीभगत मुळे या योजनेतील गैरप्रकाराला अक्षरश: उत आला आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या २ हजार ३७१ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलांना देण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये,गेल्या सहा महिन्यापासून जिवंत अळ्या आणि बुरशी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या.त्याची दखल घेऊन अनेक शाळांनी आपल्या वरिष्ठाना कळवले होते.तरीही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या फूडचे वाटप सुरूच आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी,गरीब मुलांच्या जीविताशी जीवघेणा खेळ जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाकडून आजही सुरू आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडचा पुरवठा मे.इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रा.ली.मुंबई या कंपनीतर्फे करण्यात येतो.पालघर जिल्हा परिषद अंतर्गत एकूण २ लाख ७५ हजार २९१ विद्यार्थ्याना त्याचे वाटप करण्यात येत आहे.अळ्या आणि बुरशी झालेले पोषण आहार पुरवून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.या प्रकरणी आनंद लक्ष्मण चंदावरकर विद्यालय खानिवली,जिल्हा परिषद शाळा चिंचणी नंबर ३,अशा अनेक शाळांनी आपल्या शाळेत मिळत असलेले हे फूड निकृष्ट दर्जाचे व खराब असल्याचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळवले आहे.पण आजही या फुडचा पुरवठा सुरूच आहे.
मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा करण्याकरता संबंधित पुरवठादारास पुरवठा वितरण आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी अचूक व वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्याच्या सूचना पुणे शिक्षण संचालकानी घेतली असताना त्याच ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी रजनीकांत पाटील या पालकाने केली आहे.

