दीपक मोहिते,
न्यूजलाईन,
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतीवरील कारवाईला सुरुवात,
आज नालासोपारा शहरातील सुमारे २ हजार कुटुंबावर आज आभाळ कोसळले आहे.आरक्षण असलेल्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारतीवर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने हातोडा चालवला.आज दिवसभरात या पथकाने रिकाम्या करण्यात आलेल्या इमारती जमीनदोस्त केल्या.
नालासोपारा पूर्व भागात मौजे आचोळे,सर्वे क्रमांक २२ ते ३२ व ८३ मध्ये डंपिंग ग्राउंड व मलजल प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर काही समाजकंटकांनी ४१ अनधिकृत इमारती चौदा वर्षापूर्वी बांधल्या. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.त्यावर सुमारे गेली दोन वर्षे सुनावणी होऊन काही महिन्यापूर्वी या प्रकरणी न्यायालयाने अंतिम निकाल दिला.निकालात न्यायालयाने या ४१ इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे २ हजार कुटुंबाचे धाबे दणाणले व त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली,पण न्यायालयाने त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या व महानगरपालिकेला या इमारतीवर आजपासून निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महानगरपालिकेने दोन दिवसापूर्वी रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या व आज कारवाई करण्यास सुरुवात केली.कारवाईच्या वेळी अनेक कुटुंबे गहिवरले होते.आयुष्याची सगळी कमाई लावून खरेदी करण्यात आलेली आपली घरे आपल्या डोळ्यादेखत उध्वस्त होत असताना अनेक महिलांना अश्रू आवरत नव्हते.

