दीपअसेक मोहिते,
” न्यूजलाईन,”
असे आहेत आपले नवीन आमदार : एक दृष्टीक्षेप,
विधानसभेवर निवडून आलेल्या सर्वपक्षीय २८८ आमदारांपैकी ६५ % आमदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत.या आमदारांपैकी ११८ म्हणजेच ४१ % आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत हत्या, अपहरण,हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्हयांची नोंद असल्याचे दिसून आले आहे.
या आमदारांमध्ये एकूण २२ महिला आमदार आहेत. वयोमानानुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ ( ७७ वर्षे ), दिलीप सोपल ( ७५ वर्षे ) आणि गणेश नाईक ( ७४ वर्षे ) यांचा क्रम लागतो.तर राष्ट्रवादीचे ( शरद पवार ) रोहित पाटील ( २५ वर्षे ) सर्वात तरुण आमदार आहेत.त्यांच्यापाठोपाठ भाजपचे करण देवतळे ( २९ वर्षे ),राघवेंद्र पाटील ( ३१ वर्षे ) आणि शिवसेना ( ठाकरे ) वरुण देसाई ( ३२ वर्षे ) यांचा क्रमांक लागतो.
निवडणुकीच्या निकालावर ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् ’( एडीआर ) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचच्या ताज्या अहवालानुसार निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी ( त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार ) ६५ % ( १८७ ) उमेदवारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. त्यातही ११८ (४१ % ) उमेदवारांविरोधात बलात्कार, महिलांवर अत्याचार,हत्या, हत्येचा प्रयत्न,भ्रष्टाचार, निवडणुकीशी सबंधित,असे गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत.
भाजपच्या १३२ आमदारांपैकी पैकी ९२ ( ७० % ) आमदारांवर विविध गुन्हे दाखल असून त्यामध्ये ४० % आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शिवसेना ( शिंदे गट ) ५७ आमदारांपैकी ३८ आमदारांवर ( ६७ % ) गुन्हे दाखल असून त्यात ४७ % आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादीच्या ( अजित पवार ) ४१ पैकी २० ( ४९ % ) आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.
तर शिवसेना ( ठाकरे ) २० पैकी १३,काँग्रेसच्या ९ आणि शरद पवारांच्या पक्षातील पाच आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.
अजित पवारांच्या पक्षाचे १०० % तर भाजप,शिवसेनेचे ९८ आमदार कोट्याधीश आहेत. काँग्रेसचे साजिद पठाण सर्वात गरीब आमदार असून त्यांची एकूण मालमत्ता फक्त ९ लाखांची आहे.भाजपचे शाम खोडे आणि गोपीचंद पडळकर यांची मालमत्ता अनुक्रमे ३१ लाख आणि ६५ लाख रु.इतकी आहे.

