दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
अखेर भाजपने एकनाथ शिंदे यांचा गेम केलाच…
अखेर भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यासारखाच पोपट केला.२०१९ साली उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फिरवला,त्याच धर्तीवर एकनाथ शिंदेंनाही वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती,या पत्रकार परिषदेत हताश झालेले व वांरवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भलामण करताना एकनाथ शिंदे पहायला मिळाले.
प्रादेशिक पक्षानं आपल्या पंखाखाली घेऊन त्यांना गुंडाळणे,हा संघाचा अलिखित अजेंडा आहे,त्यानुसार त्यांनी गेल्या दहा वर्षात शिवसेनेसह अनेक प्रादेशिक पक्ष संपवले.२०१४ साली त्यांनी सत्तेत आल्या आल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहकार्याचा हात पुढे केला होता.शरद पवार हे देखील त्यांना पाठिंबा देण्यास तयार झाले होते.पण बिहार,आंध्र प्रदेश,गोवा व अन्य राज्यातील काही प्रादेशिक पक्षाची झालेली अवस्था पाहून शरद पवार हे माघारी फिरले.रासपचे महादेव जानकर देखील भाजपच्या नादी लागले होते,काही काळ मंत्रीपद मिळाले,त्यानंतर मात्र भाजपने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.रिपाईचे रामदास आठवले हे पद व निवडणूक काळात जागासाठी भुणभुण करत नसल्यामुळे ते मात्र महायुतीमध्ये गेली दहा वर्षे बऱ्यापैकी स्थिरावले आहेत.दलित समाज दुखावता कामा नये,यासाठी भाजपने त्यांना सोबत ठेवले आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर केवळ गंभीर हास्य पहायला मिळाले.ते प्रचंड तणावाखाली असल्याचे दिसून आले.मोदी व शहा हे दोघे जे काही ठरवतील,ते आम्हाला मान्य असेल.आम्हाला राज्यात विकासकामे करायची आहेत,राज्याला प्रगतीपथावर न्यायचे आहे,अशी पोपटपंची ते सतत करत होते.जर मोदी व शहा हे दोघे जे काही ठरवतील,ते आम्हाला मान्य असेल,हे जर तुमचे ठरलं होत तर संजय शिरसाठ,नरेश म्हस्के,शीतल म्हस्के,दादा भुसे व त्यांचे अन्य नेते कालपासून आरडाओरड करत का फिरत होते ? गृहमंत्री अमित शहा यांनी २०१९ साली उद्धव ठाकरे यांचा गेम केला,तसाच गेम त्यांनी शिंदे यांचा केला.आज अजित पवार यांनी शांत राहण्याचा जो शहाणपणा दाखवला आहे,त्यामध्ये एकप्रकारची वेगळी भिती दडलेली आहे.

