दीपक मोहिते,
” बॉटमलाइन,”
एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांसाठी भाजपने खड्डे खणून ठेवले आहेत,
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपण नवनिर्वाचित सरकारमध्ये सहभागी होणार नाही,आमचा बाहेरून पाठिंबा असेल,असा प्रस्ताव दिल्लीला पाठवल्यामुळे भाजपचे हायकमांड,शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत.” हे होणारच होते,” आम्ही ही शक्यता आठ दिवसापूर्वीच वर्तवली होती,ती खरी ठरली आहे.यानंतर मंत्रिपद व खातेवाटप प्रक्रियेत अजित पवार गटाला देखील भाजपचे हायकमांड शॉक देण्याच्या तयारीत आहे.अर्थ,गृह,नगरविकास व महसूल,ही चारही मलईदार खाती,भाजप स्वतःकडे ठेवणार आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार गटाची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाली आहे.सत्तेच्या काळात या दोन्ही गटाला ” तोंड बांधून बुक्क्यांचा मार,” सहन करावा लागणार आहे,हे सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडीवरून सिद्ध होत आहे.
एकनाथ शिंदे व अजित पवार गटाना हा पहिला झटका असून,शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणे,आता कदापी शक्य होणार नाही.तर गेली अनेक वर्षे मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या अजित पवार यांनाही भाजप यापुढे कायम ठेंगा दाखवत राहणार.अजित पवारांना ” चक्की पीसिंग,” साठी पाठवणारे देवेंद्र फडणवीस,त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू देतील,यावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीत.वर नमूद केलेल्या चार मलईदार खात्यापैकी एखादे खाते अजित पवार गटाला दिले जाण्याची शक्यता आहे.या सर्व घडामोडीवरून एक लक्षात येते की भाजपने आता आपली वाघनखे हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे या दोघांना आपापले आमदार सांभाळावे लागणार आहेत.कारण भाजप हे १३३ जागा जिंकून बहुमताच्या समीप पोहोचले आहे.त्यांना १४४ हा जादूईचा आकडा गाठण्यास केवळ ११ जागांची गरज आहे.त्यामुळे ते खोके संस्कृतीच्या बळावर किमान १५ आमदार फोडू शकतात.ही सर्व राजकीय परिस्थिती लक्षात घेता शिंदे व अजित पवार,यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासाठी जो खड्डा खणला होता,आता त्याच खड्ड्यात त्यांना ढकलून भाजप त्यांच्यावर माती टाकण्याच्या तयारीत आहे.

