दीपक मोहिते,
स्थिर पथकाकडून वाडा येथे ३ कोटी ७० लाखाची रोख रक्कम जप्त,
वाडा विक्रमगड मार्गावरील पाली येथे काल सायंकाळी आलोंडे या गावाकडून वाडा येथे येणा-या एम एच ४३ सीई ४०५१ या क्रमांकाच्या पिकअपला स्थिर पथकाकडून रोखण्यात आले व वाहनांची तपासणी केली असता सदर पिकअपमध्ये ३ कोटी ७० लाख ५० हजार रू.ची रोख रक्कम आढळून आली.पथकाने ती जप्त केली आहे.या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.ही रोख रक्कम नक्की कुणाची आहे,याविषयी तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.
स्थिर पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेची निवडणूक सुरू असून निवडणूक आयोगाकडून विविध नाक्यांवर तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.विक्रमगड-वाडा मार्गावरील पाली फाट्याजवळही असेच पथक तैनात करण्यात आले आहे.या पथकातील कर्मचाऱ्यांनी भरधाव येणाऱ्या पिकअपला थांबवण्यात आले,वाहनाची तपासणी केली असता चालक महेंद्र सांडभोर (वय ४५ )व त्यांचे सोबत असलेले प्रतिक शिंदे, कल्पेश मिसाळ,सिक्युरिटी गार्ड रणजीत यादव यांना गाडीमधील मालसंदर्भात चौकशी केली असता सदर वाहन हे सीएमएस कंपनी कार्यालय ऐरोली नवी मुंबई यांचे असून त्यामध्ये रोख रक्कम असून ती एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.पंरतू गाडीच्या दर्शनी भागावर पुढील बाजुस चालकाचे नाव व कॅश वाहून नेण्याबाबतच्या तपशिलाची माहिती असणारा क्यु आर कोड नव्हता.तसेच वाहनामधील मधील व्यक्तींना गाडीमध्ये किती रक्कम आहे,याबाबत निश्चित आकडा सांगता येत नव्हता.त्यामुळे सदर रकमेबाबत संशय आल्यामुळे पोलीस शिपाई मनोज भोये यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर खात्री करण्यासाठी सदर पिकअप वाहन पोलीस ठाण्यात आणून दोन पंचासमक्ष व सीएमएस कंपनीचे कर्मचारी प्रतिक शिंदे व कल्पेश मिसाळ या दोघांच्या समक्ष खात्री करून पंचनामा केला असता त्या पिकअप गाडीतील पत्राच्या पेटीमध्ये ३ कोटी ३३ लाख ५० रोख रक्कम व दोन सिलबंद बॅगा परंतू सदर बॅगा संबधित कंपनीचे व्यवस्थापक यांच्याशिवाय उघडता येत नसल्यामुळे त्यांची मोजणी करता आली नाही.
याबाबत वाडा पोलीस ठाण्यात भा.ना. सु.कलम ३५ ( १ ) ( ड ) प्रमाणे स्टे.डा.नों.अन्वये रक्कम ताब्यात घेतली असून जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी दिली.

