दीपक मोहिते,
विक्रमगड वगळता इतर मतदारसंघातील बंडखोरी संपुष्टात,
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालघर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील अनेक बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले.परंतु शिंदे गटाचे बंडखोर तसेच पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी विक्रमगड मतदारसंघात मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.त्यामुळे येथील भाजपचे उमेदवार हरीश्चंद्र भोये अडचणीत आले आहेत.
१२९ विक्रमगड मतदारसंघात आता ११ उमेदवार रिंगणात आहेत.त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनील भुसारा,भाजपचे हरिश्चंद्र भोये,मनसेचे सचिन शिंगडा,बविआचे हेमंत खुताडे,शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम व अन्य सहा जण असे एकूण ११ जण रिंगणात आहेत.मात्र खरी लढत भाजपचे भोये व राष्ट्रवादीचे भुसारा यांच्यात होणार आहे. प्रकाश निकम यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराला फटका बसू शकतो.निकम रिंगणात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल भुसारा यांना मतविभागणीचा फायदा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रकाश निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा,यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले,पण ते सारे प्रयत्न व्यर्थ ठरले.दुसरीकडे अमित घोडा ( भाजप ) यांनी पालघर येथे,विनायक निकम शिवसेना ( उबाठा ) यांनी वसई येथे,जगदीश धोडी ( एकनाथ शिंदे ) यांनी बोईसर येथे आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे विक्रमगड वगळता इतर पाच मतदारसंघातील बंडखोरी संपुष्टात आली आहे.

