दीपक मोहिते,
शिट्टी या निवडणूक चिन्हासाठी बविआ मुंबई उच्च न्यायालयात,
केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे निवडणूक चिन्ह जनता दल ( युनायटेड ) पक्षासाठी राखीव ठेवल्यामुळे बहुजन विकास आघाडीसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे.त्यामुळे बविआने उच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगा विरोधात दाद मागितली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील न्यायालयामध्ये न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्यासमोर आज सकाळी बहुजन विकास आघाडीने भारत निवडणूक आयोग व इतरांच्या विरुद्ध जनहित याचिका ( रिट पिटीशन ) दाखल केली आहे.यावेळी प्रतिवादी यांना याचिकेचा तपशील पुरवण्याविषयी सुचित करण्यात आले आहे.याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे.
२० नोव्हें.रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या याचिकेची सुनावणी आज सकाळी ११.३० वाजता ठेवण्यात आली होती.याचिकाकर्त्यातर्फे प्रतिवादी यांना ई-मेल द्वारे याचिकेचा तपशील पाठवण्यात आला होता. तसेच सकाळी ११.४० वाजता निवडणूक आयोगा च्या कार्यालयात याचिका संदर्भात नोटीस पोहोचवण्यात आली.पण पुरेसा वेळ नसल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे बाजू मांडण्यासाठी न्यायालयाच्या सुट्टीच्या खंडपीठापुढे प्रतिवादीतर्फे कोणी उपस्थित राहू शकले नाही.
४ नोव्हें.रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची व त्यानंतर रिंगणात असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.याबाबत न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने निवडणूक चिन्ह देण्याबाबत केलेल्या याचिकेचे गांभीर्य पाहून प्रतिवादी यांना पुन्हा या याचिके संदर्भात माहिती ई-मेल द्वारे पाठवून नंतर न्यायालयात दाद मागावी असे आदेशात म्हंटले आहे.
त्यामुळे शिटी या निवडणूक चिन्हाची लढाई आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली असून याबाबत येत्या सोमवारी न्यायालय कोणती भूमिका घेते,याकडे बहुजन विकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे.

