दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
डहाणू येथे भाजप तर विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) यांची डाळ शिजणे कठीण,
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी १२८ डहाणू वगळता इतर पाच ठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मोठ्याप्रमाणात बंडखोरी झाली आहे.
१२८ डहाणू विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.विनोद निकोले यांच्या विरोधात भाजपचे विनोद मेढा रिंगणात उतरले आहेत.ही जागा बहुजन विकास आघाडीने लढवायचे ठरवल्यास अरुण निकोले हे त्यांचे उमेदवार असतील.या जागेवर मनसेने विजय वाढीया यांना उमेदवारी दिली आहे.मात्र या मतदारसंघात मार्क्स.कम्यु.व भाजप वगळता इतर पक्षाची ताकद नगण्य आहे.त्यामुळे विनोद मेढा व विनोद निकोले या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात डहाणूवासीयांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसेल,असे वाटले होते.पण येथे भाजपने त्या निवडणुकीत लक्षणीय मते घेतली.या निवडणुकीत मार्क्स.कम्यु.पक्षाचे आ.विनोद निकोले यांनी प्रचंड मेहनत केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांना ७४ हजार मताचा पल्ला गाठता आला.
१२९ विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे हरिश्चंद्र भोये,यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनिल भुसारा यांच्याशी आहे.भुसारा यांना या निवडणुकीत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.गेल्या पाच वर्षात त्यांचीही कारकीर्द पालघरचे आ.चिंतामण वनगा यांच्यासारखीच प्रभावी ठरली नाही.त्यामुळे या मतदारसंघात भाजपला विजयाची फार मोठी संधी आहे.२००९ व २०१४ साली भाजपच्या स्व.विष्णू सवरा व ऍड.स्व.चिंतामण वनगा यांनी बाजी मारली होती.२०१९ साली स्व.सवरा यांचे चिरंजीव डॉ.हेमंत सवरा यांचा सुनील भुसारा यांनी चांगले मताधिक्य घेत पराभव केला होता.पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.हेमंत सवरा यांनी १ लाख ६ हजार ५३ मते घेतली,त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.या मतदारसंघात ३ लाख १३ हजाराहून अधिक मतदार आहेत.या मतदारसंघात साधारणपणे सरासरी ५५ ते ५८ % मतदान होत असते.

