दिपक मोहिते,
बोईसर विधानसभा ; महायुतीतील नाराज बंडखोरीच्या तयारीत,
तारापूर
औद्योगिक क्षेत्र,मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि वसईचा ग्रामीण व शहरी भागाचा समावेश असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात बाविआ,महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चूरस आहे.पण बविआचे उमेदवार राजेश पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केल्यामुळे इतर पक्षाचे धाबे दणाणले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे,पण या मतदारसंघात अद्याप एकाही राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.महाविकास आघाडी आणि जिजाऊ संघटनेने उमेदवारी जाहीर केली आहे.महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार नावे जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.यादी जाहीर झाल्यानंतर नाराज उमेदवार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. बोईसर विधानसभा मतदार संघात मुख्य लढत बहुजन विकास आघाडी,महायुती आणि महाविकास आघाडीत असून मनसे, जिजाऊ आणि अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुक बहुरंगीं आणि अटीटतीची होण्याची शक्यता आहे.या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आहे.महायुती मधून बोईसरच्या उमेदवारीसाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी,नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाज कल्याण सभापती मनिषा निमकर आणि पालघर पंचायत समितीच्या माजी सभापती रंजना म्हसकर यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा आहे.भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार विलास तरे यांची एन्ट्री झाल्यामुळे स्पर्धेत रंगत भरली आहे.भाजपच्या सर्व्हेत माजी आमदार विलास तरे पुढे असल्यामुळे उमेदवारीसाठी अचानक विलास तरे यांचे नाव पुढे आले आहे.जगदीश धोडी उमेदवारी मिळवण्यावर ठाम असून त्यांनी त्यांच्या बोईसर स्थित कार्यालयामध्ये समर्थकांची जमवाजमव केली.दरम्यान भाजपचे पालघर विधानसभा प्रमुख संतोष जनाठे यांचे नाव मागे पडल्यामुळे ते नाराज झाले असून त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यांनी समाज माध्यमावर संदेश प्रसारित लवकरच आपण निर्णय घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या कमी आहे.परंतु डॉ. विश्वास वळवी यांचे नाव जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कमलाकर दळवी बंड करण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारा ऐवजी स्थानिक आणि निष्ठावंताला उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी बोईसर विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते मासवण परिसरात एकत्र आले होते.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोईसर विधानसभा मतदार संघात योग्य उमेदवाराच्या शोधात आहे.महायुती,महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीमधील नाराज उमेदवारांमधून सक्षम उमेदवाराने संपर्क साधल्यास उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा मनसेच्या गोटात सुरू झाली आहे.
जिजाऊ संघटनेकडून बोईसर विधानसभा मतदारसंघासाठी नरेश धोडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पण या मतदारसंघात जिजाऊ संघटनेला फारसा जनाधार नाही.
या मतदारसंघात बहुजन विकास आघाडी,महायुती आणि महाविकास आघाडी या तिघांमध्ये लढत होत असून बविआचे आ.राजेश पाटील यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे.मात्र या निवडणुकीत मनसे,जिजाऊ आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीत रंगत आणतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

