दीपक मोहिते,
” हल्लाबोल,” भाग क्र.१
…तर अजित पवार यांच्या राजकारणाला उतरती कळा लागेल..
राज्याच्या चार ते पाच मतदारसंघाच्या निवडणुकांकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.त्यामध्ये बारामती,माहीम,
इंदापूर,महाड व कवठे-महांकाळ या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे.सुशिक्षित व संस्कारी अशी ओळख असलेल्या युगेंद्र पवार यांच्या पाठीशी संपूर्ण पवार घराणे असून येथे अजित पवार यांना युगेंद्र पवार यांच्याशी एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना काकाश्री शरद पवार व बहीण सुप्रिया सुळे यांनी धोबीपछाड दिल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.आता या विधानसभा निवडणुकीत काकाश्री त्यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत.सोज्वळ व शांत स्वभाव असलेले युगेंद्र पवार हे उच्चविद्याभूषित असून सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.ते शरयू सह.सहकारी कारखान्याचे संचालक आहेत.तसेच ” पाणी,” या ज्वलंत समस्यांचे ते अभ्यासक असून त्यांनी या क्षेत्रात विविध उपक्रम व नवनवीन प्रयोग यशस्वीरीत्या राबवले आहेत.बारामतीची ही लढत केवळ काका व पुतणे अशी होणार नसून सभ्यता,संस्कार विरुद्ध उर्मटपणा व बेमुवर्तखोरपणा,यामध्ये होत आहे.बारामतीकर या निवडणुकीतही काकाश्री यांना हमखास झुकते माप देतील,असे वाटते.या मतदारसंघाला लागून असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे,या दोघांमध्ये लढत होत आहे.हर्षवर्धन पाटील व अजित पवार या दोघांमध्ये हाडवैर असून गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचा पराभव घडवून आणला होता.त्याचा वचपा हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत काढला.या विधानसभा मतदारसंघात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली व अजित पवार
यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची प्रचंड पीछेहाट झाली.यासर्व घडामोडीनंतर अजित पवार आपल्याला भाजपमधून उमेदवारी मिळू देणार नाहीत,हे लक्षात घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांचे बोट धरत विधानसभेची उमेदवारी मिळवली.ही निवडणूक अजित पवार व काकाश्री शरद पवार हे दोघेही प्रतिष्ठेची करतील. राज्यात अनेक वर्षे मंत्री
म्हणून काम केलेलेम हर्षवर्धन पाटील,हे राज्य सहकारी कारखाना संस्थेचे अध्यक्ष आहेत.ही लढत
हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे,या दोघांमध्ये जरी होत असली तरी ती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहे.या लढतीत बारामती व इंदापूर या पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघात अजित पवार यांचा पराभव झाल्यास त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागण्याची शक्यता आहे.
क्रमश:

