दीपक मोहिते,
शिवसेनेचे ( उबाठा ) जयेंद्र दुबळा व डॉ.विश्वास वळवी यांना अनुक्रमे पालघर व बोईसर येथून उमेदवारी..
काल शिवसेनेच्या ( उबाठा ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली,यादीत एकूण ६५ उमेदवारांची नांवे जाहीर करण्यात आली आहेत.पालघरहुन जयेंद्र दुबळा व बोईसर येथे डॉ.विश्वास वळवी या दोघांना संधी देण्यात आली आहे.वास्तविक या दोन्ही जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात येतील,असा अंदाज होता.
पण जयेंद्र दुबळा यांना पालघर या महत्वाच्या जागेवर संधी मिळेल,असे शिवसैनिकांच्या ध्यानीमनीही नव्हते.येथून डॉ.विश्वास वळवी यांना उभे करण्यात येईल,असा सर्वसाधारण अंदाज होता,पण त्यांना शेजारी असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात ट्रान्सफर करण्यात आले.डॉ.विश्वास वळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यांनी पालघर व बोईसर तालुक्यात शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.पण विधानसभा निवडणुकीत बोईसर मतदारसंघातून आपल्याला शिंदे गटातून उमेदवारी मिळणे शक्य नाही,हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्या मनगटावर शिवबंधन बांधले.पालघर विधानसभा हा मतदारसंघ एकसंघ शिवसेनेचा गड,पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तो विभागला गेला.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या या तालुक्यावर आपले वर्चस्व राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावतील.पण उद्धव ठाकरे यांना असलेल्या लोकांच्या सहानुभूतीचा मुकाबला ते कसे करतात,यावर त्यांचे यश-अपयश अवलंबून आहे.त्यामुळे त्यांनी अद्याप आपला उमेदवार कोण ? याविषयी ताकास तूर लागू दिलेला नाही.बोईसर येथे सेनेचे ( उबाठा ) डॉ.विश्वास दळवी,बविआचे राजेश पाटील व शिंदे गटाचे जगदीश पाटील,या तिघांमध्ये तिरंगी लढत होईल.या लढतीत बविआच्या राजेश पाटील हे मतविभागणीचा फायदा होऊन विजयी होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडे मनिषा निमकर या उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्या तरी शिंदे गटातील पदाधिकारी त्यांना ती सहजासहजी मिळवू देणार नाहीत.

