दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
नालासोपारा विधानसभा ; भाजपच्या राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर,
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.गेल्या दहा दिवसापासून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार,यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती.पण भाजपच्या पहिल्या यादीत नालासोपारा येथून राजन नाईक यांची उमेदवारी जाहीर होईल,असा अंदाज होता,तो खरा ठरला आहे.
या मतदारसंघात डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या नावांची चर्चा होत होती.पण गेली तीन दशके भाजपमध्ये सक्रिय असलेले राजन नाईक यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिली पसंती दिली.राजन नाईक यांनी २०१४ साली या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती.त्यावेळी बविआचे आ.क्षितिज ठाकूर,सेनेचे शिरीष चव्हाण व भाजपचे राजन नाईक,यांच्यामध्ये तिहेरी लढत झाली.या लढतीत आ.क्षितिज ठाकूर यांनी राजन नाईक यांचा ५४ हजार ४९९ मतांनी पराभव केला होता.या लढतीमध्ये आ.क्षितिज ठाकूर यांना १ लाख १३ हजार ५६६ तर राजन नाईक यांना ५९ हजार ६७ मते मिळाली.तर सेनेचे शिरीष चव्हाण हे ४० हजार ३२१ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर यांनी सेनेच्या प्रदीप शर्मा यांचा पराभव केला.या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर व राजन नाईक हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

