दीपक मोहिते,
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा काळाच्या पडद्याआड,
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी काल रात्री मुंबईच्या बीच कँडी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.ते गेल्या काही वर्षांपासून आजारी होते.२८ डिसें.१९३७ रोजी त्यांचा जन्म झाला होता.रतन टाटा हे केवळ उद्योगपतीच नव्हते तर ते सामाजिक बांधिलकी जपणारी महनीय व्यक्ती अशी त्यांची जगभरात ओळख होती.देशावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी ते कायम मदतीसाठी पुढाकार घेत असत.
एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी जगात नाव कमावले,टाटा समूहातील अनेक कंपन्यांचा विस्तार करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.सन २००० मध्ये त्यांना पद्मभूषण व २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून केलेली कामगिरी प्रशंसनीय होतीच,पण त्यांनी नावाजलेला ब्रँड व एक विश्वसनीय विश्वस्त संस्था उभी करून देशाचे नांव जगभरात उज्वल केले.ते सच्चे राष्ट्रवादी होते,त्यांनी आपले सारे जीवन देशाच्या विकासासाठी समर्पित केले होते.नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाच्यावेळी ते नेहमी मदतीसाठी आघाडीवर असत.त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या निधनावर उद्योग जगत व अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

