दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
अजित पवार यांना बारामती विधानसभेची भिती वाटतेय,
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पत्नीच्या पराभवामुळे पार खचून गेले आहेत.आपण जर आपल्या बारामती या परंपरागत मतदारसंघातून निवडणूक लढवली तर आपल्यासोबत धोका होऊ शकतो,अशा भितीने त्यांना सध्या ग्रासले आहे.गेली तीन दशके आपल्या काकासोबत वावरल्यानंतर आपले काका काय करू शकतात,याचा प्रत्यय गेल्या लोकसभा निवडणुकीत आल्यानंतर त्यांची दातखीळच बसली होती.त्याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होईल,असा अंदाज त्यांना आल्यानंतर मी जो उमेदवार देईन,त्याचे काम सर्वाना करावे लागणार आहे,असे पालुपद ते आळवू लागले आहेत.त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत सापडले आहेत.ते स्वतः बारामतीमधून उभे राहायला घाबरत असताना त्यांचे बोलके पोपट मात्र अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार,अशी पोपटपंची करत सुटले आहेत.
ज्या अजित पवार यांच्या उचापतीला कंटाळून हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांनी भाजपची वाट धरली होती,त्या दोघांनी सुप्रिया सुळे यांना मदत करून अजित पवार यांच्यावर एकप्रकारे सुडच उगवला.या दोघांपैकी हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हाती घेतली आहे,तर शिवतारेही त्याच वाटेवर आहेत.त्यामुळे अजित पवार आता बहिणीच्या विरोधात पत्नीला उभे करणे,ही माझी चूक होती,असे सांगत फिरत सुटले आहेत.काकांची त्यांना अतोनात भिती वाटू लागली आहे.आपण बारामती विधानसभा मतदारसंघातून उभे राहिलो तर संपूर्ण पवार कुटुंबीय आपल्या विरोधात मैदानात उतरेल,अशा भितीने त्यांना ग्रासले आहे.आपला अहंकार व उर्मटपणामुळे त्यांनी आजवर अनेक विरोधक उभे केले असून,त्यांनी ज्यांना ज्यांना त्रास दिला ते आता फक्त ते कुठून उभे राहतात,याची वाट पाहत आहेत.भाजपचे पडळकर देखील देव पाण्यात टाकून बसले आहेत.अजित पवार गटाला प.महाराष्ट्रातून नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांचे काकाश्री सध्या पायाला भिंगरी लावून प.महाराष्ट्र ढवळून काढत आहेत.त्यांना पावलोपावली मिळणारे यश पाहून अजित पवार यांची सध्या घाबरगुंडीच उडाली आहे.गुलाबी जाकीट व लाडकी बहीण,त्यांच्या मदतीला येईल,अशी शक्यता नाही.त्यामुळे अजित पवार आता निर्वाणीची भाषा बोलू लागले आहेत.

