दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्यात मुरबे समुद्रकिनारी आणखी एक बंदर,
डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर उभारणीचे सर्व अडथळे दूर झाल्यानंतर राज्य सरकारने आता पालघर तालुक्यातील मुरबे समुद्रकिनारी बहुउद्देशीय बंदर उभारण्याची तयारी चालवली आहे.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बंदराला मंजुरी देण्यात आली आहे.हे बंदर उभारण्याकामी ४ हजार २५९ कोटी रु.खर्च होणार आहेत.
काही वर्षांपूर्वी डहाणू तालुक्यातील वाढवण येथे महाकाय बंदर उभारणीच्या हालचाली जेएनपीटीनकडून सुरू झाल्या होत्या.त्याच सुमारास अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या मुरबे समुद्रकिनारी हे बहुद्देशीय बंदर उभारण्याचेही राज्य सरकारकडून सुरू झाले होते.पण वाढवण बंदराला
स्थानिक भूमीपुत्रांनी कडाडून विरोध झाल्यामुळे हा प्रकल्प गेली अनेक वर्षे अडगळीत पडला होता.मात्र गेल्या वर्षी ३१ ऑक्टो.२०२३ रोजी या प्रकल्पाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिली.तसेच वाढवण बंदराच्या मार्गातील सर्व अडथळेही दूर झाल्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकित मंजुरी दिली.मुरबे हा परिसर,मासेमारीसाठी नावाजलेल्या सातपाटी बंदरापासून हाकेच्या अंतरावर आहे.या प्रस्तावित बंदरातून प्रतिवर्षं २५ दशलक्ष टन मालाची आयात-निर्यात होणार आहे.जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला बंदर उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे.उच्छेळी व सातपाटी,या दोन समुद्रकिनारी असलेल्या मुरबे समुद्रासमोर उथळ ब खडकाळ क्षेत्रात भराव टाकून हे बंदर उभारण्यात येणार आहे.काल या कामास मंजुरी मिळाली असली तरी या परिसरातील मच्छिमार व शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नाहीत.

