दीपक मोहिते,
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ ; एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार आपला हक्क बजावतील,
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घेण्यात आलेल्या कामकाजाच्या आढावा विषयी माहिती दिली.या निवडणुकीत एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार असून ४ कोटी ९५ लाख पुरुष तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६४ लाख इतकी आहे.या निवडणुकीत १९ लाख ४८ हजार नवमतदार असून ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
येत्या २६ नोव्हे.रोजी विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे आगामी निवडणूक नोव्हे.महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडतील,असे संकेत या पत्रकार परिषदेतून मिळाले आहेत.तसेच ऑक्टो.महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.त्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.दरम्यान निवडणूक आयोगाने राज्य सचिवांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात राज्यशासनाला देण्यात आलेल्या आदेशाचे पालन न झाल्याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांना खडे बोल सुनावले.त्यामुळे अडचणीत आलेले राज्यसरकार लवकरच अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्याच्या तयारीला लागले आहे.पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीही लवकरच बदली होण्याचे संकेत मिळत आहेत.राजकीय पक्षाच्या आढावा बैठकीत अनेक नेत्यानी ही निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात याव्यात,अशी मागणी केली,पण आयोगाने त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही.राज्यात विदर्भ-६२,कोकण ७५,( मुंबई,ठाणे,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्गसह ) उ.महाराष्ट्र-४७,प.महाराष्ट्र-५८ व मराठवाडा-४६ अशा एकूण २८८ जागांवर मतदान एकाच टप्प्यात घेणे शक्य आहे का ? याविषयी आयोग पडताळणी करणार आहे.पण या निवडणुका दोन टप्प्यातच घेण्यात येतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

