दीपक मोहिते,
पेजरचे स्फोट ; आधुनिक तंत्रज्ञान अतिरेक्यांच्या हाती पडता कामा नये,
गेल्या आठवड्यात इस्रायलच्या ” मोसाद,” या जगप्रसिद्ध गुप्तचर संघटनेने हिजबुल्लाह संघटनेच्या नेत्यांना ठार मारण्यासाठी पेजर व वॉकी-टॉकीचा बेमालूम वापर केला,तो वाखाणण्याजोगा असाच आहे.या हिजबुल्लाह संघटनेने इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात उडी घेतली असून त्यांनी इस्त्रीलावर ड्रोनच्या साहाय्याने क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली होती.त्यांना रोखण्यासाठी इस्त्र्यालाच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने नवीन मार्ग स्विकारला.हाती असलेल्या या पेजर व वॉकी-टॉकीमध्ये स्फोटके भरून मोसादने अनेक लॅबेनॉन शहरात अनेक स्फोट घडवून आणले.या घडामोडीनंतर लॅबेनॉनने आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यावर बंदी घातली.मोबाईलच्या वापरामुळे इस्त्र्यायलच्या सैन्याला आपले लोकेशन कळते,व तो आपल्या नेत्याना टिपून मारतो,हे लक्षात आल्यानंतर हिजबुल्ल्लाहच्या नेत्यांनी तसेच लेबनॉनच्या नागरिकांनी मोबाईलचा वापर बंद करून पेजर व वॉकी-टॉकीचा वापर सुरू केला होता.मोबाईलचा वापर बंद झाल्यामुळे इस्त्रायली सैन्याला त्यांच्याविरोधात प्रभावी कारवाई करणे अशक्य झाले होते.मोसादने याविषयी बारकाईने अभ्यास करून आपली यंत्रणा सक्रिय केली.सर्वप्रथम त्यांनी पेजरचे उत्पादन घेणाऱ्या तैवानमधील कंपनीचा शोध घेतला व त्यांच्याशी संपर्क कसा करायचा,यावर नियोजनबद्ध आखणी केली.या कंपनीकडून जर आपण मोठ्याप्रमाणात पेजर खरेदी केले तर आपले नाव उघड होईल, व आपली योजना फसू शकते,असे लक्षात आल्यानंतर मोसादने हंगेरी देशाच्या बुडापेस्ट शहरात शेल कंपनी स्थापन केली व त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी तैवानच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमची कंपनी ही ट्रेडिंग करणारी कंपनी असून तुमच्या कंपनीचे पेजर बल्क क्वांटीटीमध्ये खरेदी करण्याचे आम्ही ठरवले असे सांगून सुमारे ३० हजार पेजर खरेदी केले. त्या पेजरचे पार्सल बुडापेस्ट येथे आल्यानंतर मोसादने त्या पेजरमध्ये बेमालूमपणे स्फोटके बसवली व ती लेबनॉनमध्ये आपल्या एजंटद्वारे किरकोळ बाजारात विक्रीसाठी पाठवली.दिसायला आकर्षक व किमत पण कमी असल्यामुळे ती हातोहात विकली गेली व गेल्या आठवड्यात या पेजरवर मोसादने मेसेजेस पाठवले.हे मेसेज वाचण्यास सुरुवात केल्याबरोबर अनेक भागात पेजरचे स्फोट झाले व ४० ते ४५ अतिरेकी या स्फोटात ठार झाले.या घटनेनंतर लेबनॉनने पेजर वापरावर बंदी घातली.हा प्रकार इस्त्रायलने घडवून आणल्याचे उघड झाल्यानंतर आता त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.यापूर्वीही या मोसादने इराणच्या दोन महत्वाच्या नेत्यांना सुरक्षेचे कडे मोडून मानवरहित यंत्रणेच्या साहाय्याने ठार मारले होते.
इस्त्रायल शत्रू राष्ट्राला नामोहरम करण्यासाठी ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे,ते तंत्रज्ञान जर जगभरातील अतिरेक्यांच्या हाती लागले तर जगभरातील देशांना इलेट्रॉनिक वस्तू वापरणे कठीण होऊन बसणार आहे.
