दीपक मोहिते,
बदलापूर लैगिंक अत्याचार ; आरोपी अक्षय शिंदे पोलीसांच्या गोळीबारात ठार,
विरोधकांकडून संशय व्यक्त,
बदलापूरच्या शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावल्याने पोलिसांनी अक्षय शिंदेचा एनकाऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे.
बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलीसांवरही गोळीबार केल्याची माहिती आहे.तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता पोलीस त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.त्यानंतर पोलिसांनी कळवा रुग्णालयात दाखल केले.तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांची बंदूक हिसकावुन
अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. एकूण तीन राऊंड फायर केलं.पोलिसांच्या पायांवर गोळीबार झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला.
या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मुत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.
दरम्यान,अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वत:वर गोळी झाडली की आणखी काही दुसरं आहे.त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे ? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे,अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
कोण आहे हा अक्षय शिंदे ?
अक्षय शिंदेचे वय २४ वर्षे असून त्याचे
शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई म्हणून कामाला होता.
त्याआधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
एका कंत्राटामध्ये तो आदर्श विद्यालयात शिपाई म्हणून कामाला लागला होता.
अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको,असे त्याचे कुटुंब आहे.
अक्षयची तीन लग्ने झाली होती,मात्र तिनही बायका त्याला सोडून गेल्या होत्या.
अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावात राहणारा आहे.
मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला होता.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती.
विशेष तपास पथकाने ( एसआयटी ) बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. शाळेचे कर्मचारी,डॉक्टर, फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह २० पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षीचा त्यामध्ये समावेश असून आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते.आरोपीने आपण या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे पोलीस चौकशीत,तसेच डॉक्टरांसमोरही मान्य केले होते.डॉक्टरांसमोर आरोपीने दिलेली माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो,असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यातील १८३ तरतुदीनुसार दोन्ही बालिकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओळखपरेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनी ओळखले आहे.

