दीपक मोहिते,
” राजकीय डावपेच,”
महामंडळाची खिरापत वाटून भाजपने डाव साधला,
भाजपच्या चाणक्याने एका चेंडूमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा नुकताच त्रिफळा उडवला आहे.शिंदे गटातील अनेकांना महामंडळाची लॉटरी लागली आहे.ज्यांना ही लॉटरी लागली आहे,त्यांना भाजपने विधानसभेसाठी असलेल्या इच्छुकांच्या भल्यामोठ्या रांगेतून आता बाहेर काढले आहे.तर अजित पवार गटाच्या तोंडालाही पाने पुसली आहेत.अशाप्रकारे अनेक इच्छुक उमेदवारांना आता उमेदवारी मागता येणार नाही.महामंडळाच्या खिरापती वाटण्यात आल्यामुळे भाजपने स्वतःचा मार्ग अत्यंत हुशारीने मोकळा करून घेतला आहे.अजित पवार व एकनाथ शिंदे या गटाच्या जागा स्वतःकडे खेचून घेण्यासाठी भाजपकडून आखण्यात आलेली रणनिती यशस्वी ठरली आहे.शिंदे गटाचे संजय शिरसाठ व भरत गोगावले हे मंत्रीपदासाठी आग्रही होते,या दोघांपैकी शिरसाठ यांना सिडको महा मंडळाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे,तर भरत गोगावले यांना मात्र हात चोळत बसावे लागले आहे.अमरावतीचे माजी खा.आनंदराव अडसूळ हे आपल्या मुलाला लोकसभेची उमेदवारी मिळावी,यासाठी जंग जंग पछाडत होते.पण त्यांना डावलून भाजपने नवनीत राणा यांना पुन्हा संधी मिळवून दिली.त्या अडसूळ याना आता अनु.जाती व जमाती आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.त्यामुळे त्यांच्या मुलाचा आता विधानसभेसाठी विचार होणार नाही व नवनीत राणा यांचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा होणार आहे.आता उर्वरित महामंडळे अजित पवार यांच्या गटाला बहाल करून मार्गातील असलेले थोडेफार अडथळे देखील भाजप दूर करेल,अशी सर्वत्र चर्चा होत आहे.गेल्या अडीच वर्षात जे इच्छुक आमदार,मंत्रीपदासाठी देव पाण्यात टाकून बसले होते.त्यांना मंत्रिपद तर मिळाले नाहीच,पण आता त्यांना आमदारकीवरही पाणी सोडावे लागणार आहे.सध्या गुलाबी होऊन फिरणाऱ्या अजित पवार यांनाही भाजप पुन्हा सफेद पेहराव वापरायला लावेल, अशी शक्यता वाटते.भाजपने विधानसभा निवडणुकीत ” स्ट्राईक रेट व निवडून येण्याची शक्यता,” असे दोन निकष लावल्यामुळे अनेक आमदारांचे धाबे दणाणले आहे.गेली अडीच वर्षे भाजपने महामंडळाच्या नियुक्त्यासंदर्भात कधीही हालचाल केली नाही.मात्र दोन दिवसापूर्वी त्यांना अचानक अशी उपरती व्हावी,ही घटना म्हणजे भाजपची यामागे तिरकी चाल आहे,हे शिंदे व पवार गटाने समजायला हवे.उर्वरीत महामंडळे अजित पवार यांच्या गटाला बहाल केली गेली तर भाजप या खेळीत १०० % यशस्वी झाला,असे समजायला हरकत नाही.

