दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नोटांच्या खोक्यावर ज्या पक्षाचा डोलारा उभा आहे,ते फुलं नाहीतर नोटाच उधळणार…
ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मठात नोटाची उधळण करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन शिवसैनिकावर आता पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.पण ही कारवाई करताना शिंदे गटाने या दोघा शिवसैनिकाकडून खुलासा करा,आदेश दिला आहे.या घटनेची व्हिडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली असताना त्यांच्याकडून खुलासा मागणे,हे न समजण्या पलिकडचे आहे.कारण ज्या पक्षाचा डोलारा हा खोक्याच्या पायावर उभा आहे.त्यांच्या शिलेदारांकडून नोटांचाच पाऊस पडणार,त्यांनी ते कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडले. कारण,त्यांनी आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा इव्हेंट पार पाडला आहे.अडीच वर्षांपूर्वी या पक्षाचे नेते व आमदारांवर खोक्यांचा पाऊस पडला होता.तर या प्रकरणात या दोघा शिवसैनिकांनी ढोल पथकांवर नोटांचा पाऊस पाडला.त्यामुळे तुम्ही-आम्ही आश्चर्य वाटून घेता कामा नये.या दोघा शिवसैनिकांवर सध्या जी कारवाई करण्यात आली आहे,ती ” मी मारल्यासारखे करतो,तू रडल्यासारखे अशा पठडीतील आहे.” लोकांचा राग शांत करण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने ही कारवाई केल्याची चर्चा होत आहे.त्यांच्याकडे खुलासा मागणे,म्हणजे नक्की काय ? किती रकमेच्या नोटा उधळल्या याविषयीचा खुलासा असणार आहे का ? ज्या नोटा उधळण्यात आल्या,त्या कोणाच्या खोक्यातील होत्या ? हे ते खुलासा करणार आहेत का ? शिंदे गटाने प्रदर्शित केलेल्या सिनेमात एक नगरसेवक निवडून आल्यानंतर अवघ्या काही महिन्यात तो चार चाकी वाहन विकत घेतो,गाडी घेतल्याच्या आनंदात तो मिठाईचा पुडा घेऊन दिघे यांना भेटायला मठात येतो.त्यावेळी आनंद दिघे यांचा संताप अनावर होतो व ते हातात आसूड घेऊन त्या नगरसेवकांचा गळा आवळतात व त्याला खडे बोल सूनावतात.आज त्यांच्याच मठात त्यांनी ज्यांना आपले विश्वासू सहकारी मानले,त्या एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक त्यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळतात.धर्मवीर आनंद दिघे यांनी उभारलेली शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही जी वाटचाल झाली आहे,ती मराठी मनाला पटणारी नाही.राज्यात ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते,अशा लोकांचे हिंदुत्व हे खरं हिंदुत्व,हे आम्ही मानायचं तरी कसं ?

