दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नागपूर हिट अँड रन ; महायुतीला परिणाम भोगावे लागणार,
राज्यात महायुती सरकारला गेल्या तीन महिन्यापासून एकामागून एक असे अपशकुन होत आहेत.पुणे व वरळी येथे हिट अँड रन,बदलापूर बलात्कार,मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे आणि आता नागपूर येथे हिट अँड रनची घडलेली ताजी घटना.या सर्व घटना महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणाऱ्या आहेत.
या प्रत्येक घटनेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महायुतीच्या घटक पक्षांचा संबध आला आहे.पुणे येथे घडलेल्या हिट अँड रन घटनेतील आरोपी हा अजित पवार गटाशी संबधित आहे,या गटाचा एक आमदार आरोपीच्या संदर्भात पोलिसांनी सौम्य भूमिका घ्यावी,असे सांगण्यासाठी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गेला होता.त्यानंतर वरळी मुंबई येथे घडलेल्या घटनेत एकनाथ शिंदे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख यांचा मुलगा आरोपी होता.बदलापूर बलात्कार प्रकरणात दोषी असलेले संस्थाचालक व मुख्याध्यापिका अद्याप फरार असून ही संस्था संघाशी संबधित आहे.या सर्व घटना ताज्या असताना मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे,या पुतळ्याचा शिल्पकार हा मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी संबधित आहे आणि आता नागपूर येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे असल्याचे उघड झाले आहे.या सर्व घटनांमुळे भाजपचा काळा चेहरा महाराष्ट्रासमोर आला आहे.मात्र त्यांचे नेते व वाचाळवीर प्रवक्ते प्रत्येक घटनेनंतर विरोधक घाणेरडे राजकारण करत नेरेटिव्ह पसरवत असल्याचे सांगत सुटले आहेत.तुमच्या लोकांनी मद्यधुंद होऊन गोरगरीब जनतेला आलिशान गाड्याखाली चिरडायचे,आणि तुम्ही पोलिसांवर दबाव टाकून ती प्रकरणे दाबून टाकायची.परत वर तोंड करून विरोधकांवर आगपाखड करायची,हा कुठला न्याय आहे ? ही सर्व प्रकरणे महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत भोगावी लागणार आहेत.

