दीपक मोहिते,
” निवडणूक विशेष,”
जागावाटपात भाजपच ” मोठा भाऊ,”
गृहमंत्री अमित शहा हे सालाबादप्रमाणे,
” लालबागच्या राजा,” च्या दर्शनासाठी काल मुंबईत आले होते.या दौऱ्यात त्यांनी गणेश दर्शन व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप,असा दुहेरी कार्यक्रम आखला होता.त्यांनी विमानतळावर फडणवीस,शिंदे व अजित पवार या त्रिकुटाला चर्चेसाठी पाचारण केले होते.यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर या तिघांचे चांगलेच कान टोचले.त्यांनी महायुती ही अभेद्य राहिली पाहिजे,असा सज्जड दम या तिघांना दिला.तसेच महायुतीची भूमिका माध्यमासमोर मांडण्यासाठी केवळ तीन प्रवक्ते नियुक्त करा,अशी सूचना केली.त्यामुळे सध्या प्रवक्त्याची जी खोगीरभरती झाली आहे,ती निश्चितच कमी होणार आहे.महायुतीमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वादावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.हे वाद थांबवून महायुतीने एकोप्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा त्यांनी सल्ला दिला.जागावाटपासंदर्भात त्यांनी या तिघांना पुसटशी कल्पना दिली आहे.त्यावरून
भाजप- १६०,
शिवसेना,शिंदे गट- ८०,
राष्ट्रवादी,अजित पवार गट- ४०,
उर्वरित जागा अपक्ष -८, असे जागावाटप होण्याची शक्यता आहे.भाजपच्या जागांच्या निम्या जागा एकनाथ शिंदे गटाला तर शिंदे गटाच्या जागांच्या निम्म्या जागा अजित पवार गटाला,असे सूत्र ठरवण्यात आले आहे.या व्यतिरिक्त महायुतीचे समर्थक असलेल्या अपक्ष उमेदवारासाठी आठ जागा सोडण्यात येणार आहे.ज्या जागांवर उमेदवार निवडून येतील,अशा उमेदवारांची यादी सर्वप्रथम तयार करा व त्यानंतर एकमताने जागावाटप करा,असे त्यांनी या तिघांना सांगितले आहे.जागावाटपाच्या या सूत्रानुसार भाजपने अप्रत्यक्षपणे महायुतीमध्ये आम्हीच ” मोठा भाऊ,” असल्याचे संकेत दिले आहेत.

