दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपला जळीस्थळी शरद पवारच दिसतात,
काल गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले होते.तर शरद पवार यांनीही आपले जावई व नातीसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.शरद पवार यांनी गणपतीचे दर्शन घेतल्यामुळे भाजप नेत्यांचा आता पोटशूळ उठला आहे.पक्षाचा प्रवक्ता कसा असू नये,याचे प्रतिक असलेले प्रविण दरेकर सध्या या विषयावर अकलेचे तारे तोडत आहेत.ते म्हणतात,शरद पवार यांचे गणपती दर्शन हे नौटंकी आहे,घसा फोडून ओरडत आहेत,शरद पवार यांचे गणेश दर्शन ही जर नौटंकी असेल तर मग गृहमंत्री अमित शहा यांचे गणपती दर्शन,हा तमाशा समजायचा का ? शरद पवार यांना हिंदुत्व विरोधी ठरवण्यासाठी भाजप कायम आगपाखड करत आला आहे.त्यामुळे त्यांच्या टीकेला कोणी भीक घालणार नाही.
आपल्या दैवताचे दर्शन घेणे,यावरून गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही लोक नक्की धडा शिकवतील.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो पराभव पत्करावा लागला,त्यास शरद पवार यांची रणनिती कारणीभूत ठरल्यामुळे भाजपचे नेते पार हडबडून गेले आहेत.त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही.मात्र एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही गट मात्र या विषयी भाजपला साथ देत नाहीत.शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर टीका केल्यास ते महाराष्ट्राच्या जनतेच्या पचनी पडणार नाही व त्याचा फटका आपल्याला बसेल,अशी त्यांना भिती वाटते.गेल्या लोकसभा निवडणुकीत याच अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर ” भ्रष्टाचाऱ्याचा टीमलीडर,” अशा जहरी भाषेत टीका केली होती.त्याचे परिणाम भाजपला भिवंडी, बीड,ईशान्य मुंबई व अहमदनगर या भाजपच्या बालेकिल्ल्यात भोगावे लागले.बारामती मतदारसंघात आपल्या पत्नीचा सुप्रिया सुळे यांनी दारुण पराभव केल्यानंतर अजित पवार हे मात्र आपल्या काकाविरोधात तोंडातून चकार शब्द बाहेर काढत नाहीत.त्यांना शरद पवार यांच्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला कि ते ” नो कॉमेंट्स,” म्हणत उत्तर द्यायचे टाळतात.

