दीपक मोहिते,
गडकरी यांचे आगमन ; देवेंद्र फडणवीस यांची पीछेहाट सुरू,
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी याना पाचारण केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्यास सुरुवात झाली आहे.राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय नेत्यानी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव हा केंद्रीय नेतृत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आखलेले डावपेच अंगाशी आल्यानंतर दिल्लीत त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महायुतीच्या नेत्यानी केलेल्या बेलगाम वक्तव्यामुळे तर आगीत तेल ओतले गेले.विरोधकांनी सरकारवर एकामागोमाग जोरदार हल्ले चढवले.त्यामुळे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत येऊन माफी मागावी लागली.त्यामुळे आता राज्याची कमान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खूप जवळचे नेते आहेत.काही वर्षांपूर्वी त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात संघाचा मोलाचा वाटा होता.राज्यात अजित पवार गटाला सोबत घेण्याचा निर्णय संघाला मान्य नव्हता,या गटाला सोबत घेतल्यास पक्षाला फटका बसेल,असे मत संघाच्या अनेक नेत्यानी त्यावेळी व्यक्त केले होते आणि घडलंही तसच,त्यामुळे संघाच्या मुखपत्राने चांगलीच टीकेची झोड उठवली होती.या सर्व घडामोडीनंतर राज्यात सामूहिक नेतृत्व तयार करण्याच्या कामाला वेग आला व गडकरी यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे,पंकजा मुंडे,देवेंद्र फडणवीस व अन्य काही जणांची फौज देण्यात आली आहे.केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची पीछेहाट सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे.

