दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” दादाचा वादा,” नाही तर ” दादाचा वांदा,” होणार,
महायुतीच्या घटक पक्षात आता बॅनरवॉर सुरू झाले आहे.श्रेयवादाच्या सुतळी बॉम्बची वात अजित पवार गटाने पेटवली आहे.त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भर बैठकीत अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.प्रकरण हातघाईवर येत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,त्यामुळे दुर्घटना टळली.फडणवीस यांनी यापुढे एकट्याने कोणीही श्रेय घेणार नाही,असे जाहीर केले.फडणवीस यांच्या मध्यस्थी व दिलेल्या आदेशानंतर अजित पवार गटाच्या मंत्र्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मिळावे,यासाठी अजित पवार हे सध्या नको ते उपदव्याप करत सुटले आहेत.गुलाबी जाकीट,गुलाबी रंगाच्या गाड्या,गुलाबी फेटे व टोप्या,यांची सध्या उधळण त्यांनी चालवली आहे.गुलाबी जाकीट सह आणखी ते गुलाबी रंगाचे काय काय पेहराव करतात,देव जाणे ?
मुख्यमंत्री,लाडकी बहीण योजना,असे या योजनेचे स्वरूप असताना त्यांनी आपल्या बॅनर्स व होर्डिंगवरून ” मुख्यमंत्री,” हे नांव तर हटवलेच त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोनाही हद्दपार केले.या योजनेचे सारे श्रेय उपटण्यासाठी धडपडणाऱ्या अजित पवार यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे,अब्दुल सत्तार यांनी कान चांगलेच उपटले.प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली व यापुढे एकट्याने कोणाला श्रेय घेता येणार नाही,असे आदेशवजा दम भरला.अजित पवार यांच्या या अशा उचापतीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात केवळ देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले बॅनर्स लावत त्यांना ” घरचा आहेर,” दिला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या २० ते २२ जागा निवडून येण्याची शक्यता असताना अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल,अशी गुलाबी स्वप्ने पडत असतील,तर भगवी स्वप्ने पडणाऱ्या एकनाथ शिंदे गट व भाजप,हे गप्प बसतील का ? आता आणखी एक उपदव्याप त्यांनी सुरू केला आहे,” दादाचा वादा,” या नावाने गाणे प्रसारीत केले आहे.त्यामुळे शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व भाजपची मंडळी,आता ” दादाचा वादा,” नव्हे तर ” दादाचा वांदा,” करण्याच्या तयारीला लागतील अशी शक्यता आहे.

