दीपक मोहिते,
भाजप,पालघर विधानसभेसाठीही आग्रही,
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
नालासोपारा,विक्रमगड व डहाणू भाजपला तर वसई,पालघर व बोईसर शिंदे गटाला समसमान जागा,असे सूत्र ठरले असताना भाजप पालघरसाठी आता आग्रही आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांनी पालघर विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य घेतले होते.त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला दोनच जागा देऊ पाहत आहे.त्यांच्या सर्व्हेनुसार पालघर विधानसभा शिंदे गटाला जिंकता येणे शक्य नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी,असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी लावून धरली आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्वापार बालेकिल्ला असून केवळ २००९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता येथे झालेल्या सर्व निवडणुका शिवसेनेने जिंकल्या आहेत.मात्र त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडात सेनेचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात गेले,परंतु शिवसैनिकांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.या सर्व घडामोडीनंतर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळू लागली.पण भाजपने पैश्याच्या बळावर बाजी मारली.लोकसभा निवडणुकीत पैश्याचा खेळ झाला नसता तर उद्धव ठाकरेच्या उमेदवार भारती कामडी यांनी बाजी मारली असती.आजही पालघरवासीयांची उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे.त्यामुळे भाजप शिंदे गटाकडून ही जागा खेचून घेण्याच्या तयारीत आहे.या मतदारसंघात उद्धव ठाकरे पुन्हा भारती कामडी याना रिंगणात उतरवतील अशी शक्यता आहे.भारती कामडी जर रिंगणात असतील तर एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराची डाळ शिजणार नाही,असे भाजपचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावरही दावा करण्यास सुरुवात केली आहे.

