दीपक मोहिते,
पापाचा घडा भरणार,
शिखर बँक आर्थिक घोटाळा ; अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता,
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे.एकीकडे अनेक सहकारी पक्ष सोडून शरद पवार गटात सामील होत आहेत,दुसरीकडे भाजपमध्ये अजित पवार गटाची ” संगत नको रे बाबा,” असा सूर आळवणारा एक मोठा गट सक्रिय झाला आहे.त्यामुळे अजित पवार यांची स्थिती ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घटनाक्रम लक्षात घेता,” नियती कधीच कोणाला सोडत नाही,” असेच खरं म्हणावे लागेल.
शिखर बँकेच्या २५ हजार कोटी रु.घोटाळ्याच्या प्रकरणाने आता पुन्हा डोकं वर काढले आहे.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटला आर्थिक गुन्हे शाखेने विरोध केला आहे.शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना सप्टें.२०२० मध्ये क्लीन चिट देण्यात आली होती,त्याला आता नव्याने आव्हान देण्यात आले आहे.याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात दोन क्लोजर रिपोर्ट दाखल केले होते.यावर सात सहकारी साखर कारखान्यांनी आपले आक्षेप नोंदवले होते.त्यामध्ये जरंडेश्वर,जय अंबिका,जालना,पारनेर,कन्नड,प्रियदर्शिनी व पद्मश्री विखे पाटील या सहकारी साखर कारखान्याचा त्यामध्ये समावेश आहे.या याचिकांमागोमाग काही साखर कारखान्यातील सभासदांनीही या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात आपल्या याचिका दाखल केल्या आहेत.या सर्व याचिकांवर न्या.अदिती कदम यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.येत्या ५ ऑक्टो.रोजी मुंबई सत्र न्यायालयात या याचिकावर महत्वाची सुनावणी होणार आहे.त्यामुळे आता अजित पवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.शिखर बँक घोटाळ्यानंतर जलसिंचन घोटाळ्याचे प्रकरणही पुन्हा वर येण्याची शक्यता आहे.

