दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
तुतारी,घड्याळाची टिक,टिक बंद करणार का ?
अजित पवार गटाच्या घडाळ्याची टिक टिक तुतारीच्या गगनभेदी आवाजामुळे बंद होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अजित पवार गटातील अनेकजण भिंतीवरील घड्याळ दूर सारून त्याच्या जागी तुतारी लटकवण्याच्या तयारीत आहेत.
अजित पवार गटातील अनेक आमदार व पदाधिकारी महायुतीत आपल्यावर होणाऱ्या टीकेमुळे नाराज असून त्यांना शरद पवार यांची साथ सोडल्याचा आता पश्चाताप होऊ लागला आहे.समरजीत घाटगे हे भाजपचे व तर अन्य काही पदाधिकारी अजित पवार गटाचा त्याग करून शरद पवार गटात सामील झाले आहेत.आता ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे देखील अंतर्गत धुसफुसीला कंटाळले असून लवकरच ते तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्या मतदारसंघात माजी खा.रणजित नाईक-निंबाळकर व भाजपचे जयकुमार गोरे हे गल्लोगल्ली जी दहशत निर्माण करत आहेत,ती त्वरित रोखा,अशी त्यांनी मागणी केली आहे.पण त्यांच्या या मागणीला पक्षश्रेष्ठीनी केराची टोपली दाखवल्यामुळे त्यांचा संताप झाला आहे.काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत,रामराजे निंबाळकर यांनी आपल्या तक्रारीची दखल वरिष्ठांनी घेतली तर ठीक आहे,जर त्यानी तशी घेतली नाही तर आपल्याला तुतारी हाती घ्यायला वेळ लागणार नाही,असे स्पष्ट केले आहे.त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही,त्यामुळे रामराजे निंबाळकर लवकरच तुतारी हाती घेतील,अशी चर्चा सुरू झाली आहे.

