दीपक मोहिते,
शरद पवार यांनी जाळे फेकण्यास सुरुवात केली,
या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व वरीष्ठ नेते शरद पवार हे दोघे अजित पवार यांना धक्के देण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटाचे खासदार व आमदारांच्या भेटी गाठी घेण्याचे सत्र या दोघांनी सुरू केले आहे.त्यांच्या या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश येत असल्याचे दिसून येत असून अनेक दिग्गज नेते भाजप व अजित पवार गटाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या तीन प्रमुख पक्षात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.आगामी निवडणुकीत आपली डाळ शिजणार नाही,हे लक्षात आल्यानंतर अनेक जण आता परतीच्या वाटेवर आहेत.
राज्यातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे,तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,खा.संजय राऊत,खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,रोहित पवार,विजय वडेट्टीवार या महाविकास आघाडीच्या आक्रमक संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांची अक्षरशः धाव काढली आहे.त्यामुळे खासदार व आमदार मंडळी पार बिथरले आहेत.काल भाजपचे मदन भोसले व जयंत पाटील या दोघांमध्ये मदन भोसले यांच्या निवासस्थानी बंद दाराआड तासभर चर्चा झाली.या चर्चेनंतर जयंत पाटील हे हसत हसत त्यांच्या घरातून बाहेर पडले.त्यामुळे मदन भोसले हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील,असे वाटते.तसेच इंदापुरचे बडे प्रस्थ हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपमधून बाहेर पडायच्या तयारीत असल्याचे समजते.कोल्हापूरचे भाजपचे समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात आज किंवा उद्या प्रवेश होणार आहे.या सर्व घडामोडी घडत असताना अजित पवार गटाचे अतुल बेनके यांनीही शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली.तेही लवकरच अजित पवार यांना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.या सर्व घडामोडी पाहता शरद पवार यांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तंबू रिकामा करण्यासाठी जाळे फेकण्यास सुरुवात केल्याचे जाणवू लागले आहे.

