दीपक मोहिते,
उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर जोरदार हल्ला,
मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ” महाराष्ट्र बंद ,” च्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद बोलावली होती.या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.यावेळी त्यानी मुख्यमंत्री शिंदे हे विकृत मानसिकतेचे असल्याचा आरोप केला.
बदलापूर येथे शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले,या दुर्देवी घटनेमुळे लोकांमध्ये संताप असून यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.तर पोलीस व शाळेचे संस्थाचालक यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे.तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला.त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बदलापूरकरानी रस्त्यावर उतरून तब्बल ९ तास आंदोलन केले.यावेळी रेलेरोको आंदोलन केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती.या घटनेनंतर राज्यभरात जोरदार पडसाद उमटले.त्यामुळे आता आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत.त्यांच्या अकलेच्या दिवाळखोरपणाबद्दल मी बोलणार नाही.परंतु,ज्या प्रमाणे निवडणूक डोळयासमोर ठेवून जनतेचा पैसा जनतेला देण्यासाठी त्यांच्या सरकारने योजना आणली.त्यात हे सरकार आता राजकारण आणत आहेत,म्हणून मुख्यमंत्री हे विकृत मानसिकतेचे आहेत,असे म्हणावे लागत आहे.महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही,तर त्यातून लोकांचा संताप व्यक्त होणार आहे.कोरोनाच्या काळात महाराष्ट्र कुटुंब बनून कोरोनाच्या विरुद्ध लढला.तशीच आता वेळ आली आहे.विकृतीचा निषेध नाही तर बंदोबस्त करण्यासाठी राज्यातील माझ्या बहिणींना मी आवाहन करतोय कि या भावाना धडा शिकवा.आपली मुलंबाळं शाळेत जात आहेत.त्या शाळेतही मुली जर का सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली,या वाक्याला काय अर्थ उरतो ? त्यासाठी या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे.राजकारण म्हणून नाही तर माता भगिनीं सुरक्षित राहिली पाहिजे,याचे भान सर्वांनी ठेवायला हवं.ही घटना घडली तेंव्हा मुख्यमंत्री कुठे होते.राज्यभर निषेध होत असताना मुख्यमंत्री रत्नागिरीत लाडक्या बहिणींकडून राखी बांधत होते.अहो तुम्ही तुमच्या हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा.,किती निर्लज्ज व्हाल…., असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुफान हल्ला चढवला.

