दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात भाजपकडून ” घरचा आहेर,”
अजित पवार गट व भाजपमध्ये गळती सुरू झाली आहे.सिंदखेडराजाचे आ.शिंगणे हे पुन्हा शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.मी नाईलाजास्तव अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे त्यांनी नुकतेच माध्यमांना सांगितले.त्यानंतर अवघ्या आठ तासात आ.पंकजा मुंडे यांच्या जवळच्या समर्थकांनी मराठा नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे.त्यामुळे लवकरच अनेक जण महायुतीला राम राम ठोकून परतीच्या प्रवासाला लागतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील राजकीय वातावरण महायुतीला पोषक नाही,हे लक्षात घेऊन महायुतीचे आमदार,पदाधिकारी व कार्यकर्ते आता ” सुबहका भुला,शामको घर लौटा,” च्या तयारीत आहेत.
अजित पवार गटाला सोबत घेतल्यापासून महायुतीमध्ये सुंदोपसुंदीला सुरुवात झाली.भाजप व शिंदे गटाचे अनेक आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होईल,अशा भितीने ग्रासले आहे.आज भाजपच्या कार्यकर्त्यानी अजित पवार याना त्यांच्या यात्रेदरम्यान नारायणगाव येथे काळे झेंडे दाखवले.त्यामुळे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा तिळपापड झाला व त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी खुलासा करावा,अशी मागणी केली आहे.भाजपला शासकीय कार्यक्रमात डावलण्यात आल्याचा आरोप निदर्शने करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यानी केला.अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांनी हा पक्षाचा कार्यक्रम होता,त्यामुळे भाजपला डावलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,असे स्पष्ट करत भाजपने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्येही एकमेकांच्या फायलीवर सह्या करण्यावरून कलगीतुरा रंगू लागला आहे.मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या दोघांमध्ये चांगलीच तू तू मै मै झाली होती.एकंदरीत हे चित्र पाहता अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीच्या गळ्यातील लोढणे ठरू लागला आहे.भाजपने २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी अनेक जागांवर बंडखोरांना रसद पुरवली होती.तशीच खेळी भाजप,याही निवडणुकीत खेळेल,अशी भिती एकनाथ शिंदे व अजित पवार गटाच्या अनेक आमदारांना वाटू लागली आहे.त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या दोन्ही गटाच्या आमदारांची पळापळ सुरू होईल…

