दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष,
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र,झारखंड,जम्मू-
काश्मीर व हरियाणा या चार राज्यापैकी जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जम्मू-काश्मीर राज्यात १८,२५ सप्टें व १ ऑक्टो.अशा तीन टप्यात मतदान होणार आहे.तर हरियाणा राज्याची निवडणूक १ ऑक्टो.रोजी पार पडणार आहे.या दोन्ही राज्याच्या निवडणुकीची मतमोजणी ४ ऑक्टो.रोजी करण्यात येणार आहे.उर्वरीत महाराष्ट्र व झारखंड राज्याची निवडणूक ऑक्टो.महिन्यात होईल,असा अंदाज आहे.जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे.३७० कलम हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.त्यामुळे या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.२०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सोबत आघाडी करून सरकार बनवले होते.कालांतराने या आघाडीत बेबनाव निर्माण झाला व भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला.त्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्पती राजवट लादली.केंद्र सरकारने प्रशासकीय यंत्रणा स्वतःकडे आल्यानंतर वादग्रस्त ३७० कलम एका वटहुकुमाने हटवले.या सर्व घडामोडीनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,भाजप,नॅशनल कॉन्फरन्स,पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी व डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी ( गुलाम नबी आझाद ) या पाचजणामध्ये लढती होतील.या राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स या दोन इंडिया गटातील घटक पक्षामध्ये जागावाटपा संदर्भात समझौता होण्याची शक्यता आहे.तर भाजप व पीडीपी हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील,असा अंदाज आहे.गुलाम नबी आझाद यांच्या पक्षामुळे काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स या दोन पक्षाला या निवडणुकीत काही जागांवर फटका बसू शकतो.या राज्यात एकूण ९० जागा आहेत,त्यापैकी काश्मीर खोऱ्यात ४७ तर जम्मूमध्ये ४३ जागा आहेत.एकूण ८८ लाख मतदार आहेत.
हरियाणा राज्यातही विधानसभेच्या ९० जागा आहेत.२०१९ साली जेजेपी व भाजपची सत्ता आली होती.येथे काँग्रेस,भाजप व जेजेपी ( जननायक जनता पक्ष ) अशा तिरंगी लढती होतील,असा अंदाज आहे.१ ऑक्टो.रोजी होणाऱ्या या निवडणुकीत दोन कोटी मतदार आपला हक्क बजावतील.जम्मू-काश्मीर राज्यात फुटीरतावाद,सुरक्षा व ३७० कलम हटवणे,इ.ज्वलंत विषयावर प्रचाराचा भर असेल तर हरियाणा येथे कृषी क्षेत्राचे प्रश्न,कृषी उत्पन्नाना किमान हमी भाव ( एमएसपी ) इ. विषय हाताळण्यात येतील.

