दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
- अजित पवार,पुन्हा तिसरी घोडचूक करण्याच्या तयारीत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपले चिरंजीव जय पवार यांना उभे करण्याचे संकेत दिले आहेत.अजित पवार हे पुन्हा घोडचूक करत आहेत,एकतर त्यांनी स्वतः उभं राहावं,किंवा जिल्ह्यातील एखाद्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांला उमेदवारी द्यावी,अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत मुलगा पार्थ पवार व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपली पत्नी सुनेत्रा पवार उभं करून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता.यातून शहाणे न होता त्यांनी पुन्हा बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार याला उभे करण्याची तयारी चालवली आहे.
त्यामुळे काकाश्री,लाडकी बहीण व पुतण्या त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी जंग जंग पछाडतील,अशी शक्यता आहे.येथे काकाश्री आपले नातू युगेंद्र पवार या रिंगणात उतरवतील,असे वाटते.या दोघांमध्ये लढत झाल्यास युगेंद्र पवार बाजी मारतील.तसं घडलं तर अजित पवार हे पराभवाची हॅटट्रिक करतील.कुटुंबातील स्वकीयांचे सलग झालेले पराभव,हे यांच्या राजकीय वाटचालीला हानिकारक ठरू शकते.आपला नेता, आपली पत्नी व आपल्या मुलांना निवडून आणू शकत नाही,तो पक्षाला कसा उभारी देईल,असा प्रश्न साहजिकच पक्षाचे आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनात नक्कीच उभा ठाकणार आहे.अजित पवार हे बारामतीमध्ये आपल्या मुलाला उमेदवारी देऊन स्वतः जामखेड विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे.त्यांनी जर असा निर्णय घेतला तर तो देखील त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.या मतदारसंघातून रोहित पवार हे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम शिंदे यांचा पराभव करून निवडून आले आहेत.त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे गेली पाच वर्षे जामखेड मतदारसंघ पिंजून काढत आहेत.त्यामुळे भाजप ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देईल,असे वाटत नाही.तडजोड म्हणून जर ही जागा अजित पवार यांना दिली गेली तर राम शिंदे त्यांना सहकार्य करतील,असे वाटत नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे कट्टर विरोधक माजी आ.विजय शिवतारे व इंदापुरचे हर्षवर्धन पाटील,या तिघांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलजमाई घडवून आणली होती.पण या दोघांनी त्या निवडणुकीत अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला होता.तसाच करेक्ट कार्यक्रम जामखेडमध्ये रोहित पवार व भाजपचे माजी आ.राम शिंदे व बारामतीमध्ये काकाश्री,लाडकी बहीण व पुतणे,त्यांचे चिरंजीव जय पवार यांचा करतील.त्यामुळे निदान या निवडणुकीत तरी अजित पवार यांनी नको तो आततायीपणा करता कामा नये,असा एक मतप्रवाह पक्षात आहे.

