दीपक मोहिते,
अमेरिकेचे विस्तारवादी धोरण, ( भाग क्र.१ )
बांगला देशातील वादळामागे अमेरिका,
गेल्या पंधरा दिवसात बांगला देशात जे काही घडलं,त्यामागे आरक्षण हे कारण होते,हे जगजाहीर आहे.पण अचानकपणे इतके मोठे आंदोलन कसं उभं राहते ? आणि बांगला देशाचे लष्कर पंतप्रधान शेख हसीना याना हेलिकॉप्टर देऊन देशातून पलायन करायला कशी मदत करते,हे नक्की काय गौडबंगाल आहे.याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता,या सर्व कुटील कारस्थानामागे अमेरीकेचा हात असल्याचे दिसून आले आहे.विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात ढाका येथे असलेल्या अमेरिकेच्या वकालतीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने या प्रश्नी महत्वाची भूमिका पार पाडली.
परराष्ट्र धोरण विभागाच्या या अधिकाऱ्याने या आंदोलनाचे वकालतीमध्ये बसून सूत्रसंचालन केले होते.शेख हसीना वाजेद सरकार हे कायम भारत सरकारच्या बाजूने झुकलेले असायचे.तर चीन देखील दक्षिण आशियामध्ये हातपाय पसरु पाहत आहे,नेपाळ सारखा देश देखील चीनच्या कच्छपी लागला आहे.भविष्यात चीनची वाकडी नजर बांगला देशावर पडणार,हे गृहीत धरून अमेरिकेने नोव्हे.२०२३ पासून आखणी करण्यास सुरुवात केली होती.त्याची अंमलबजावणी मे २०२४ पासून सुरू झाली.निमित्त होत,आरक्षणाचे.बांगला मुक्ती लढ्यात ज्या जमाते इस्लामी या कट्टर इस्लामिक संघटनेने पाकिस्तानच्या लष्कराला सर्वोतोपरी मदत केली होती.त्या संघटनेवर शेख हसीना वाजेद सरकारने आजीवन बंदी घातली होती.अमेरिकेने या कट्टर इस्लामिक संघटनेला खतपाणी घालण्यास सुरुवात केली.या कुटील कारस्थानात अमेरिकन वकालतीमध्ये काम करणाऱ्या मॅथ्यू बे या मुत्सद्दी अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.गेल्या महिन्यात या मॅथ्यू बे यांनी जमाते इस्लामी संघटनेच्या प्रमुख नेत्यांशी बैठक घेतली होती.त्यानंतर जमाते इस्लामी,विद्यार्थी संघटना व बांगला नॅशनल पार्टी ( बेगम खालिदा झिया ) या तिघांनी एकत्र येऊन देशात हिंसाचाराचे थैमान घातले व शेख हसीना वाजेद याना देश सोडावा लागला.अमेरिकेने अस का केलं ? अमेरिकेचे एकंदरीत अविश्वासू धोरण लक्षात घेतले तर एक बाब प्रकर्षाने जाणवते कि अमेरिका ज्या देशाकडे मैत्रीचा हात पुढे करतो,कालांतराने त्या देशात ते आपले लष्कर घुसवतात किंवा त्यांची सीआयए त्या देशाचे सरकार उलथवून टाकते.अफगाणिस्तान,
इराक,व्हिएतनाम,लाओस,क्युबा,या देशात त्यांनी आपले सैन्य घुसवले.पण या सर्व देशात त्यांच्यावर नामुष्कीची पाळी आली.अमेरिका हा एक असा देश आहे,त्याची तुम्ही सतत हाजी हाजी करत राहिल्यास तो तुमचा मित्र असतो,पण ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या निर्णयाला विरोध कराल,त्या दिवसापासून तो लष्कर घुसवण्याच्या कामाला लागतो.गेल्या काही वर्षांपासून शेख हसीना वाजेद या अमेरिकेला जुमानत नव्हत्या.कारण अमेरिका जमाते इस्लामी या कट्टर धार्मिक संघटनेला फंडिंग करत असल्याची कुणकुण त्यांच्या सरकारला लागली होती.तसेच अमेरिकन वकालतीमधून होत असलेल्या कारवायाही त्यांच्या लक्षात आल्या होत्या.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान याना पदच्युत करण्यामागे देखील अमेरिकाच होती.अमेरिका सुरुवातीला मदतीचा हात पुढे करते,कालांतराने तोच हात आपला गळा पकडतो,असा अनुभव आजवर अनेक देशांना आला.इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन हे एकेकाळी अमेरिकेचे जिवलग मित्र होते,पण सद्दाम यांनी कुवेतच्या तेल विहिरी ताब्यात घेण्यासाठी कुवेतवर हल्ला चढवला व अमेरिकेचे पित्त खवळले आणि त्यांनी इराकवर सलग दहा दिवस अविरत बॉम्बहल्ले करत इराकला बेचिराख केले.इराक व कुवेत यांच्या युद्धात अमेरिकेने का पडावे ? असा प्रश्न साहजिकच आपल्यासमोर उभा राहतो. त्याचे उत्तर आहे कुवेतमधील तेलविहीरी हेच आहे.या तेलविहीरी अमेरिकेच्या ताब्यात आहेत.कुवेतच्या या तेलविहरीतून अमेरिकेला आपल्या एकूण गरजेच्या ४८ % तेल त्यांना कुवेतमधील या विहिरीतून मिळत असते.त्यामुळे अमेरिकेने इराकला बेचिराख तर केलेच पण सद्दाम हुसेनलाही फासावर लटकवले.बांगला देशात बेगम खालिदा झिया यांना सत्तेत बसवण्यासाठी अमेरिकेने हा सारा खटाटोप चालवला आहे.येथे त्यांनी स्वतःचे लष्कर पाचारण केले नाहीतर सीआयएचा बेमालून वापर करत शेख हसीना वाजेद या सत्तेतून घालवले.आपल्या शेजारच्या राज्यात पाकधार्जिणे सरकार आणण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न आहे.भारत दक्षिण आशियात बलवान होण्याच्या तयारीत आहे,हे अमेरिकांनाना मान्य नाही.
त्यामुळे आपणही अडचणीत येऊ शकतो,आपले मोदी सरकार देखील अमेरिकेच्या नादी लागले आहे.हा देश आपला व्यापार व वर्चस्व यासाठी कोणत्याही थराला जात असतो,हे लक्षात घेऊन आपन सावध राहायला हवे.
क्रमश:

