दीपक मोहिते,
” विधानसभा निवडणूक विशेष,”
विधानसभा निवडणूक २०२४ ; राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग,
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.उद्धव ठाकरे व काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत दाखल झाले असून खा.राहुल गांधी व खा.खर्गेसह अन्य नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया गटाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर या गटातील घटक पक्ष आता विधानसभा जिंकण्यासाठी सक्रिय झाले आहेत.जागावाटपासंदर्भात बोलणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकला आहे.आज रात्री ते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत नवतरुणांना संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे.दहा जागांवर त्यांनी उमेदवारांची नांवे देखील जाहीर केली आहेत,आणि ते आतापासून जिल्हे पिंजून काढत आहेत.महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मतभेद निर्माण होऊ नये,म्हणून तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते विशेष खबरदारी घेत आहेत.या प्रक्रियेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मिठाचा खडा टाकू नये,यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही,आपण सर्व भावंडे आहोत,असे स्पष्ट केल्यामुळे पटोले याना आपल्या पोपटपंचीला लगाम घालावा लागला आहे.या सर्व परिस्थितीमुळे महाविकास आघाडीचे जागावाटप सुरळीत होईल,असा अंदाज आहे.
दुसरीकडे एनडीएच्या आघाडीवर शांतता दिसत असली तरी तीन इंजिन सरकारचे राज्यनेते गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात आहेत.दरम्यान अजित पवार यांनी ” ज्या जागा ज्या पक्षाकडे आहेत,त्या त्यांना मिळाव्यात,” असा आग्रह धरला आहे,पण त्यांची ही मागणी भाजप मान्य करेल,असे वाटत नाही.त्यांच्या पक्षानेही २८८ जागांचा सर्व्हे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत एका संस्थेतर्फे स्वतंत्र सर्व्हे केला होता.या सर्व्हेनंतर भाजपने अजित पवार व एकनाथ शिंदे गटाच्या अनेक खासदारांची तिकीटे कापली होती.त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनीही आपल्या पक्षातर्फे स्वतंत्रपणे सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला.मात्र या सर्व्हेचा अहवाल गृहमंत्री अमित शहा स्विकारतील असे वाटत नाही.एकनाथ शिंदे मात्र सध्या ” डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरा ” च्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.दरम्यान महाविकास आघाडीचे जागावाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

