वसई-विरार मनपा क्षेत्राला देहर्जे प्रकल्पातून १९५ द.ल.लि.पाणी मिळणार,
पालघर,
देहेर्जे प्रकल्पातून वसई विरार शहर महानगरपालिकेस १९५ द.ल.ली.पाणी उपलब्ध करून देण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी संबधित विभागांना निर्देश दिले आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सन २०५५ च्या प्रस्तावित लोकसंख्येस पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी देहेर्जे मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्याबाबतच्या आ.हितेंद्र ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले होते.उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच विधानभवन,मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकी कार्यवाही करण्यासंदर्भात नगर विकास विभागाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व जलसंपदा विभागास निर्देश दिले.तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या १५३ व्या बैठकीतील इतिवृत्तात पाणी वाटपाचे नियोजन अंतर्गत १९५ द.ल.ली.प्रतिदिन पाणी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी आरक्षित करण्याबाबत सुधारणा करण्यात यावी, असे सुचवले.
सदर बैठकीत आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई परिमंडळात ४ नवीन सर्विस स्टेशन,चिंचोटी सब स्टेशन उभारणे तसेच विरार शहरास कनेक्टीव्हिटी देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत विचारणा केली.त्यांनी यावेळी लीना पॉवर टेक कंपनी काम करीत नसल्याची तक्रार त्यांनी केली.वसई वीज परिमंडळ समस्यांबाबतच्या या प्रश्नासंबंधी चिखलडोंगरी सर्विस स्टेशनचे काम करणेसाठी एजन्सी नियुक्त करण्याबाबत ७ दिवसांत निर्णय घ्यावा,असे उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले असून उर्वरित कामण,कोपरी व मनोर सर्विस स्टेशनबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. वसईच्या भूमिगत केबलचा प्रस्ताव कोकण विभागाच्या ३ हजार कोटीच्या प्रस्तावात समाविष्ट करण्यात यावा व चिंचोटी येथे सब स्टेशन उभारण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले.जर लीना पॉवरटेक कंपनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर सदर कंपनी बदलण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.
सदर बैठकीस पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितीज ठाकूर,आ.राजेश पाटील, आ.निरंजन डावखरे, मा.अपर मुख्य सचिव ( जलसंपदा विभाग ) दीपक कपूर, मा.अपर मुख्य सचिव ( उर्जा विभाग ) आभा शुक्ला, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार,वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, उपसचिव अजिंक्य बगाडे, कार्यकारी संचालक ( कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ) अतुल कपोले,तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर व प्रवीण शेट्टी तसेच प्रफुल साने इ.उपस्थित होते.

