दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सूर्य देखील खुदकन हसला असेल,
पाच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती.त्याच्या या टीकेला खा.सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले होते.त्यानंतर शरद पवार यांनीही अमित शहा यांना त्याच भाषेत पलटवार केला.शरद पवार हे कधीही कोणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करत नाहीत.पण अमित शहा यांनी ज्या भाषेत त्यांना लक्ष्य केले,त्यामुळे त्यांनी आपला संयम सोडला व शहा यांना चांगलेच फैलावर घेतले.शरद पवार यांनी केलेला पलटवार हा ” ऍक्शनवर रीऍक्शन,” अशा सदरात मोडणारा आहे.या सर्व घडामोडींवर आता भाजपचे बोलघेवडे प्रवक्ते अकलेचे तारे तोडू लागले आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर पक्षात महत्वाची पदे भोगणारे चंद्रशेखर बावनकुळे,प्रवीण दरेकर आशिष शेलार व प्रसाद लाड,याविषयी आता पोपटपंची करू लागले आहेत.
पुणे येथे झालेल्या मेळाव्यात अमित शहा यांनी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असल्याचा जाहीर आरोप केला होता.त्याचे राज्यात जोरदार पडसाद उमटले,खा.सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांच्या टीकेचा चांगल्या भाषेत समाचार घेतला.प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही,काल शरद पवार यांनी आपला मूळ स्वभाव बाजूला ठेवत अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले,” सर्वोच्च न्यायालयाने ज्याला गुजरात राज्यातून तडीपार केले,तो अशाप्रकारची टीका करतो,याला काय म्हणावे ? ” शरद पवार यांनी केलेला हा पलटवार भाजपच्या वर्मी बसला व देवेंद्र फडणवीसांची तमाम पिल्लावळ बिळाच्या बाहेर आली.त्यांनी पोपटपंची सुरू केली.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर ” सूर्याला दिवा दाखवण्याचा कोणी प्रयत्न करू नये,” अशी प्रतिक्रिया देत आपण प्रखर अंधभक्त आहोत,याचा प्रत्यय आणून दिला.त्यावर शरद पवार यांनीही सौम्य भाषेत मिस्कील प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,” हा दिवा आम्ही तुरुंगात पाहिला,” त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर मात्र पोपटपंची करणाऱ्या प्रवक्त्याची दातखीळ बसली,कारण पवार यांच्या वक्तव्यानंतर एकाही प्रवक्त्याची प्रतिक्रिया आली नाही.

