विवा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅकचे ” बी ++,” मानांकन,
पालघर,
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तसेच मुंबई विद्यापीठ संलग्नित विवा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, विरार कॉलेजने राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यापन परिषद ” नॅक,” च्या प्रथम मूल्यांकनामध्ये २.८४ सीजीपीए गुणांकनासह ” बी प्लस प्लस,” (बी++) मानांकन प्राप्त केले आहे.
बी.फार्मसी हा अभ्यासक्रम वर्ष २०१० सुरू करण्यात आला, त्यानंतर फार्मसीला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे २०१३ साली स्वतंत्रपणे विवा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.अशीच प्रगती करत असताना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या ६० वरून १०० इतकी वाढवून मिळाली. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात एम्. फार्मसी फार्माकोलॉजी हा विषय घेऊन अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आला.
११ व १२ जुलै २०२४ रोजी मूल्यांकन फेरी अंतर्गत नॅक पिअर टीमने भेट दिली. नॅक च्या नव्या निकषांनुसार महाविद्यालयाने नॅकला सादर केलेल्या स्वयंमूल्यनिर्धारण अहवालाचे ( एसएसआर ) सात निकषांवर मूल्यांकन केले जाते.सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन,नवनिर्मिती व विस्तार,पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत,विद्यार्थी सहायता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रम यांचा समावेश असतो.या सातही निकषांच्या आधारे नॅकच्या पिअर टीमने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले.
याप्रसंगी पालक,आजी व माजी विद्यार्थी यांच्यासोबत अध्ययन व अध्यापन या संबंधी सुसंवाद साधला. तसेच महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजाची पडताळणीही केली.संस्था चालकांशी संवाद साधून महाविद्यालयीन गुणात्मक बाबींची चर्चा केली.
या मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये संस्थेचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर तसेच संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन.पाध्ये,विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी,नॅक समन्वयक डॉ.वैशाली शाह,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.अर्चना बेले,विभाग प्रमुख डॉ. संघदिप गजभिये आणि इतर संस्था सदस्य यांनी प्रेरणा दिली आणि मोलाचे मार्गदर्शनही केले.संस्थेने दाखविलेल्या विश्वासामुळे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्याने विवा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेजला ” बी प्लस प्लस,” (बी++) दर्जा प्राप्त झाला आहे. भविष्यात येणा-या शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा अधिकाधिक उंचवण्यास सदैव आग्रही व प्रयत्नशील राहू,असे मत प्राचार्या डॉ. सुनिता ओगले यांनी व्यक्त केले.

