दीपक मोहिते,
अमित शहा यांची विखारी टीका ; महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता,
दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली.त्याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले.खुद्द अजित पवार गटाच्या अनेक आजी-माजी आमदारांनी त्यांच्या टिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तर दस्तुरखुद्द अजित पवार यांनी याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ” नो कॉमेंट्स,” असे सांगत वेळ मारून नेली.शहा यांच्या या अशा टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसेल,अशी भिती आमदार खाजगीत व्यक्त करत आहे.
एकीकडे भाजप शरद पवार यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांनी आरक्षणाच्या प्रश्नी लक्ष्य घालावे,यासाठी त्यांची भेट घेऊन साकडे घालताना पाहायला मिळाले,विखारी टीका व मार्गदर्शनपर भेट,याची सांगड कशी घालायची,अशा ब्रम्हसंकटात महायुतीचे नेते सापडले आहेत.
या मेळाव्यात अत्यंत आक्रमकपणे भाषण करताना अमित शहा यांची जीभ घसरली,आपल्या भाषणात शहा म्हणाले, ” भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा ” सरगना,” ( गुंड ) कोण असेल तर ते शरद पवार होय,” तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाही त्यांनी अत्यंत खालची पातळी गाठली.अशाप्रकारची टीका महाराष्ट्राच्या जनता कदापी सहन करणार नाही,हे अजित पवार यांनाही माहीत आहे,त्यामुळे शहा यांच्या टीकेवर त्यांनी ” नो कॉमेंट्स,” अशी प्रतिक्रिया दिली.काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” शरद पवार हे माझे गुरू आहेत,” असे जाहीर वक्तव्य केले होते.तसेच पवार यांच्या विनंतीवरून त्यांनी बारामतीला भेट देऊन शरद पवार यांनी उभारलेल्या विविध प्रकल्पाची पाहणी केली व पवार यांचे तोंडभरून कौतुक केले होते.आज तेच शरद पवार भाजपला ” सरगना,” वाटू लागले आहेत.मात्र शहा यांची ही विखारी टीका,आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाच्या खाईत ढकलणारी ठरू शकते.त्यामुळे शिंदे व अजित पवार गट चांगलेच अडचणीत आले आहेत.

