दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जरांगेंना ताकद देणारे कोण ? शिंदे सेना संभ्रमावस्थेत…
५०० कोटींच्या कथित व्यवहारावरून महायुतीमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात ” प्रत्येक आमदाराने बाजूच्या तालुक्यातील आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्यास आपले नेते एकनाथ शिंदे हे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात,” असे वक्तव्य केले. त्यानंतर अवघ्या काही तासात तथाकथित ५०० कोटीच्या व्यवहाराच्या ऑडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली. हा केवळ योगायोग नसून सत्तास्पर्धेचा जीवघेणा खेळ सुरु झाल्याचे मानण्यात येत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप व शिंदे गटाचे नेते आता एकमेकांवर तुटून पडत आहेत. शिंदे यांना बदनाम करण्यासाठी काही राजकीय शक्ती सक्रिय झाल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. तर भाजपचे अनेक नेतेही आता मैदानात उतरुन पलटवार करत आहेत.
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत ५०० कोटी रु.च्या कथित व्यवहाराचा आरोप केल्यानंतर महायुतीतील भाजपा आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाच्या नेत्यांवर जोरदार आरोप केले. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर तोंडसूख घेण्यास सुरुवात केली. प्रवीण दरेकर यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.” देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी जरांगे पाटील यांना ताकद कोण देत आहे, हे लवकरच समोर येईल,” असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.
सत्तेत एकत्र असताना मित्रपक्षांवर अशा प्रकारचे आरोप करणे, योग्य नाही. एकनाथ शिंदे यांच्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांचे भाजपा समर्थन करत नाही. मात्र या प्रकरणामागे कोण आहे आणि कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय आहे, याची एसआयटीकडून चौकशी करावी, अशी मागणी करत, चौकशीच्या आडून भाजपाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी सुनावले. तुम्हाला तुमच्या नेत्याचा आदर आहे, तसाच आम्हालाही आमच्या पक्षाचा आणि नेत्याचा आदर आहे. त्यामुळे सत्तेत एकत्र असताना अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे आहे, असे ते पुढे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले, तेव्हा भाजपाने त्यांना वेळोवेळी पाठिंबा दिला होता आणि आजही मराठा समाजाच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर टीका करायला पडद्याआडून जरांगे यांना ताकद देणारे आणखी कोणी होते ? असा प्रश्न आम्ही विचारायचा का ? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांच्याविरोधात कोण कोण होते आणि पडद्यामागे काय घडले, हेही कालांतराने समोर येईल, असा इशारा त्यांनी दिला.
५०० कोटींच्या कथित व्यवहारावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षांमध्ये सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आजच्या घडीला शिंदे गटाकडून रामदास कदम तर भाजपकडून प्रवीण दरेकर व प्रसाद लाड हे आपापल्या पक्षाची खिंड लढवत आहेत. या सर्व प्रकरणाचा शेवट कसा होतो ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

