दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बविआ मधून भाजपमध्ये गेलेल्या गयारामांची अवस्था ” सांगता येत नाही,आणि सहनही होत नाही,” अशी झाली आहे,
विधानसभा निवडणुकीत वसई, नालासोपारा व विरार या तीन मतदारसंघात पराभव झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये चलबिचल निर्माण झाली होती. त्यानंतर पक्ष सोडून जाणाऱ्या गयारामाच्या संख्येत वाढ होत गेली. आपल्याला बविआकडून उमेदवारी मिळणार नाही, तसेच भाजपच्या वादळासमोर बविआचा टिकाव लागणार नाही, असे गृहीत धरून अनेकानी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा तंबू गाठला. त्यापैकी आठ ते दहा जणांना भाजपकडून उमेदवारी देखील मिळाली.त्यापैकी केवळ चार ते पाच जणांना निवडणूक जिंकता आली. गेल्या सहा महिन्यात या गयारामाची भाजपमध्ये आजच्या घडीला काय स्थिती आहे ? हे तपासण्याची गरज आहे.
भाजपमध्ये संघाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या स्वयंसेवकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, असा आजवरचा इतिहास आहे. २०१४ साली मोदी यांचे सरकार सत्तेत स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदी व अमित शहा या दोघांनी या परंपरेला छेद देत, इतर पक्षातील हवशे – नवश्यांसाठी पक्षाचे दरवाजे सताड उघडले. ” काँग्रेस मुक्त भारत, ” असे स्वप्न उराशी बाळगत या दोघांनी भारतीय काँग्रेससह अनेक राष्ट्रीय पक्ष खिळखिळे केले. केंद्रिय, राज्य व स्थानिक स्तरावरील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेण्याचे त्यांचे धोरण कमालीचे यशस्वी ठरले.
*गेल्या जाने. महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान भाजपने बहुजन विकास आघाडीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. निवडणुका जाहीर होताच अनेक माजी नगरसेवक, नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. त्यापैकी काही जणांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामध्ये काही किरकोळ अपवाद वगळता मतदारांनी अनेकांना या निवडणुकीत चांगलाच धोबीपछाड दिला. जे विजयी झाले, त्यांना भाजपने एकही महत्वाचे पद दिले नाही. विरोधी पक्ष नेतेपद, गट नेता, या महत्वाच्या पदावर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली.
आज या सर्व गयारामांची पक्षातील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. भाजप बाहेरच्या पक्षातून आलेल्याना पक्षात प्रवेश देतो, त्यासाठी राज्यस्तरीय नेतेही प्रवेश सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. त्यानंतर मात्र या लोकांचे हाल कुत्रं देखील खात नाही, असा आजवरचा अनुभव आहे. वसई – विरारमध्ये हेच घडले.आज भाजपमध्ये गेलेले अनेकजण माघारी जाण्याच्या मन: स्थितीत आले आहेत, पण आपल्याला बहुजन विकास आघाडीमध्ये पूर्वीचे स्थान व मानपान मिळेल का ? संभ्रमावस्थेत सापडले आहेत, त्यामुळे सध्या त्यांची अवस्था ” सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी झाली आहे.

