दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
माजी आ. हितेंद्र ठाकुर यांच्या राजकारणाला ओहोटी,
लोकसभा, विधानसभा निवडणूकीत दारुण पराभव झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काठावर विजय मिळवणाऱ्या माजी आ. हितेंद्र ठाकूर यांची सद्दी आता संपल्यात जमा आहे. ज्या हितेंद्र ठाकूर यांच्याशिवाय राज्यस्तरावर भाजप अन्य राजकीय पक्षाचे पान हलत नसे, त्या हितेंद्र ठाकूर यांची राजकीय पक्षाना आता गरज उरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी विधान परिषद, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधून आमदारकी पटकावण्यासाठी अनेक राजकीय पक्षाचे नेते ठाकूर यांच्या दरबारी दाखल होत असत. मात्र गेल्या दोन वर्षात ठाकूर यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला व गर्दी पार ओसरत गेली. एकेकाळी विवा कॉलेजच्या आवारात जी जत्रा पाहावयास मिळायची ती आता इतिहासजमा झाली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेत सध्या पालकमंत्री गणेश नाईक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी प्रसाद लाड यांची चलती आहे. दुसरीकडे भाजपचे काही नगरसेवक देखील महानगरपालिकेचे अधिकारी व बहुजन विकास आघाडीच्या मागे हात धुवून लागले आहेत. यापूर्वी या महानगरपालिकेत विरोधी पक्षाचे अस्तित्व नव्हते, त्यामुळे बहुजन विकास आघाडीला रान मोकळे मिळाले होते. पण गेल्या निवडणुकीत भाजपचे ४४ नगरसेवक निवडून आले व आघाडीच्या मनमानी कारभाराला चांगलाच चाप बसला. गेल्या वर्षभरात झालेली प्रत्येक महासभा गोंधळात पार पडली. भाजपच्या या नगरसेवकांना अलिखित आदेश आहेत की आघाडीच्या आक्रमकतेला जशाचे तसे उत्तर द्या.त्यामुळे विरोधी पक्षनेते मनोज पाटील,अशोक शेळके, गणेश पाटील व अन्य काही नगरसेवक यांची फायर ब्रिगेड सध्या चांगलीच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. क्रीडासंकुल व नाट्यगृह उदघाट्न प्रसंगी याच फायर ब्रिगेड यांनी सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करून सोडले होते. या महानगरपालिकेत टेंडर मिळवण्यासाठी सध्या जे काही चालले आहे, ते पाहता येथील करदात्याच्या घामाच्या पैश्याचे काही खरं नाही. टेंडर्सच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे भविष्यात या महानगरपालिकेत कधी काहीही घडू शकते. या सर्व रणधुमाळीत
बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आता थकले असून, त्यांच्या पश्चात पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळेल, अशी एकही व्यक्ती त्यांच्या पक्षाकडे नाही. तसेच हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ असलेले राजीव पाटील हे देखील आपापसातील मतभेदामुळे पक्षापासून चांगलेच दुरावले आहेत. हल्ली राजीव पाटील हे निवांत असून विधानसभा निवडणुका समीप आल्या की ते सुतळी बॉम्ब फोडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यासर्व घडामोडी लक्षात घेता वसई, विरार व नालासोपाऱ्याचे मतदार हितेंद्र ठाकुर यांना पुन्हा संधी देतील, असे वाटत नाही. ज्या भाजपच्या नेत्याशी हितेंद्र ठाकूर यांची जवळीक होती, सध्या तेही आता त्यांच्यापासून अंतर राखून आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळुनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे माजी खा.कपिल पाटील व मुरबाडचे आ. किसन कथोरे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचा गेम केला. निवडणूक एकत्र लढले, पण वरून दट्ट्या बसल्यानंतर मात्र हितेंद्र ठाकूर यांना गाफिल ठेवून या सर्वानी त्यांचा गेम केला. हितेंद्र ठाकुर यांना गतवैभव मिळवण्यासाठी सर्वप्रथम पक्षात सध्या जे हवशे नवशे गोळा झाले आहेत, त्यांची क्षमता पाहून त्यांना खड्यासारखे दूर करावे लागणार आहे.
आज वसई विरार शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पार डबघाईला आली आहे. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. दर महासभेच्या अजेंड्यावर १५ ते २० विषय असतात, पण ते तकलादू स्वरूपाचे असतात. त्यामध्ये एक विषय अदृश्य स्वरूपात असतो तो म्हणजे “:ओरबाडून खाणे,” होय.

