दीपक मोहिते,
पर्यटन, उपजीविका व मूलभूत सुविधांवर भर द्या – मनोज रानडे,
ग्रामीण भागाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा, स्थानिक रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि पर्यटन विकास यांना प्राधान्य देऊन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिले.
रानडे यांनी १३ ऑक्टो. रोजी मोखाडा तालुक्यातील किनिस्ते येथील जि. प. केंद्र शाळेत स्पार्क फाउंडेशन व किनिस्ते ग्रामस्थांच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या सभामंडपाला पद्मश्री भिकल्या धिंडा सभागृह असे नाव देण्यात आले असून त्यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले. यावेळी स्पार्क फाउंडेशनचे संचालक मकरंद दीक्षित, किनिस्ते सरपंच योगेश दाते, उपसरपंच पंकज शिंदे तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्घाटनानंतर रानडे यांनी सूर्यमाळ ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामे व शासकीय योजनांचा आढावा घेतला. आपले सरकार सेवा केंद्र, मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेचा प्रस्ताव, विहिरीशी संबंधित पाणीसमस्या आणि जल जीवन मिशनच्या कामांची माहिती घेतली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीची पाइपलाइन जोडणी लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या.
यावेळी त्यांच्या हस्ते नवीन घरकुलाचे उद्घाटन करून लाभार्थ्याला घराची चावी देण्यात आली. तसेच अंगणवाडीला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करण्यात आली. सूर्यमाळमधील महसुली गावे दूरवर असल्यामुळे प्रत्येक गावात महिला बचत गट स्थापन करून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता व्हीबी-जी राम जी योजनेअंतर्गत मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यानंतर पंचायत समिती जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जव्हार प्रांत कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत आकांक्षित तालुका विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. जव्हारमधील पर्यटन विकासाच्या संधींचा उपयोग करून स्थानिकांना रोजगार व उपजीविकेची साधने उपलब्ध करून द्यावीत. विकासकामांचे नियोजन करताना स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि नागरिकांच्या आर्थिक प्रगतीचा विचार करून विभागांनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शन रानडे यांनी केले.
या दौऱ्यावेळी माजी सभापती,मोखाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

