दीपक मोहिते,
राज्याच्या धरणातील पाण्याची स्थिती चिंताजनक,
राज्यातील एकूण ९२९ मोठ्या धरणांमध्ये सरासरी फक्त ४४ % पाणीसाठा शिल्लक आहे, गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा ९०.५५ % इतका होता. त्यामुळे राज्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
मराठवाडा विभागात सर्वात गंभीर परिस्थिती असून यंदा फक्त २९ % पाणीसाठा शिल्लक आहे.गेल्यावर्षी तो ८५.८६ % इतका होता. बीड जिल्ह्यात पाणीसाठा तर १६.३८ % पर्यंत खाली आला आहे.
विदर्भ विभागातील अमरावती – ६२.९२ %, नागपूर – ७२ %, गेल्या वर्षी तो ८५ ते ८९ % इतका होता.
पुणे जिल्ह्याच्या खडकवासला साखळी धरणात ९१.९४ % असला तरी पुणे शहरात १५ ऑक्टो.पासून दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो आणि दररोज १० % पाणीकपात लागू केली आहे.
मुंबईच्या सात तलावात ९४.२४ % साठा उपलब्ध आहे.गेल्यावर्षी तो ९९% इतका होता.
दरम्यान सरकारने पाणी चोरी रोखण्यासाठी पोलिस गस्त, ट्रान्सफॉर्मर जप्ती अशी कारवाई सुरू केली आहे. तसेच ६०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
आयएमडी अहवालानुसार जून २०२६ मध्ये प्रशांत महासागरात अल निनो सुरू झाला असून गेल्या महिन्यात तो ” स्ट्रॉंग अल निनो, ” मध्ये बदलला आहे. तो मार्च २०२७ पर्यंत राहणार आहे, असा अंदाज व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.त्याचा मान्सूनवर चांगलाच परिणाम झाला आहे. यंदा भारतात सरासरीपेक्षा १३ % कमी पाऊस पडला. ७५९ मि.मी. पाऊस झाला, हा गेल्या ११ वर्षातील सर्वात कोरडा मान्सून ठरला आहे.गेल्या जूनमध्ये ३५.४ % तूट, ऑगस्टमध्ये १६.३ % तूट निर्माण झाली असून यंदा धरणे भरलीच नाहीत.हा अल निनोचा परिणाम असल्याचे हवामानतज्ञाचे. म्हणणे आहे.
अल निनो म्हणजे प्रशांत महासागराचे पाणी गरम होणे, त्यामुळे भारतातील मान्सूनचे वारे कमकुवत होतात.निसर्गाच्या या कोपामुळे यंदा जाने. २०२७ पासून तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
दरम्यान सरकारने नुकताच आदेश काढला आहे की पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्या, शेती आणि बांधकामासाठी पाणी बंद करा.उपलब्ध पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवायचे नियोजन सध्या सुरू आहे.
पाणी अडवा-पाणी जिरवा, जलसाक्षरता, टँकर लॉबीवर नियंत्रण आणि अल निनोचा इशारा असतानाही नियोजन न केल्याबद्दल प्रशासनाची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.

