दीपक मोहिते,
२८० लाभार्थ्यांच्या ₹२३.८० कोटींच्या भरपाई वितरण प्रक्रियेस प्रारंभ,
पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी तसेच प्रकल्पबाधित लाभार्थ्यांना भरपाईची रक्कम जलद, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने वितरित करण्याच्या उद्देशाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या युनीपे प्लस प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत या प्रणालीद्वारे २८० लाभार्थ्यांच्या एकूण ₹२३.८० कोटी रु.च्या भरपाई वितरण प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला.
या बैठकीस पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणूच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती अनन्या रेड्डी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, पालघरचे उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, सर्व उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत लाभार्थ्यांना भरपाईचे वितरण करणे,हा एक महत्त्वाचा भाग आहे. मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना भरपाई वितरित करावयाची असल्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार पालघर जिल्हा प्रशासन आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून युनीपे प्लस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी या प्रणालीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. तसेच २८० लाभार्थ्यांना ₹२३.८० कोटीची भरपाई वितरित करण्यासाठी एका क्लिकद्वारे व्यवहाराची प्रक्रिया सुरू करून या प्रणालीचे उद्घाटन केले. या प्रणालीमुळे एकाच प्रक्रियेद्वारे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना भरपाईची रक्कम वितरित करणे शक्य होणार असून, प्रत्येक व्यवहारासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. विभागीय आयुक्तांनी तंत्रज्ञानाधारित या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादनाशी संबंधित भरपाई वितरण प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता आणि समन्वय निर्माण होणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये भरपाईची रक्कम अचूक आणि सुरक्षित पद्धतीने जमा करणे, व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे तसेच प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणे आणि त्याचा मागोवा घेणे अधिक सुलभ होणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनावरील प्रशासकीय कामाचा ताण कमी होऊन भरपाई वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये भूसंपादन आणि संबंधित लाभार्थ्यांना वेळेत भरपाईचे वितरण करणे विशेष महत्त्वाचे आहे. वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत भरपाई वितरणासाठी आधुनिक डिजिटल प्रणालीचा वापर केल्यामुळे लाभार्थ्यांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि बँक यांच्यातील समन्वयामुळे मोठ्या प्रमाणावरील आर्थिक व्यवहार अधिक प्रभावीपणे हाताळणे शक्य होणार आहे.
युनीपे प्लस ही युनियन बँक ऑफ इंडियाने विकसित केलेली तंत्रज्ञानाधारित देयक प्रक्रिया प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना एकाच वेळी भरपाईची रक्कम वितरित करणे, व्यवहारांच्या अचूक नोंदी ठेवणे, वितरणासाठी लागणारा वेळ कमी करणे तसेच प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे शक्य होणार आहे.
हा उपक्रम युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे विभागीय प्रमुख बी. पी. दास, ईबीसी प्रमुख श्री. लोकनाथ साहू तसेच श्री. सावन शिव आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहकार्याने राबवण्यात आला.
पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण यांच्या योगदानातून, पालघर जिल्हा प्रशासन आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबवण्यात आला. या डिजिटल प्रणालीमुळे वाढवण बंदर प्रकल्पातील भूसंपादन लाभार्थ्यांना भरपाईची रक्कम जलद, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने वितरित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

