दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्याची घसरण सुरु झाली आहे, दुसरीकडे गुजरात अग्रेसर होतोय,
राजकीय नेते सार्वजनिक पैश्याची कशी उधळपट्टी करतात, हे दाखवायचे झाल्यास फडणवीस सरकारकडे बोट दाखवता येईल. गैरप्रकार, आर्थिक गैरव्यवहार व दिशाभूल कारभार करणारे फडणवीस सरकार हे यासंदर्भात रोलमॉडेल ठरले आहे.
२०१८ – १९ साली राज्यावर ४.०७ लाख कोटीचे कर्ज होते, ते २०२५ – २६ मध्ये ९.७३ लाख कोटीवर गेले. पुढील आर्थिक वर्षात ते ११.०२ लाख कोटी वर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कर्जाच्या व्याजापोटी सरकारला दरवर्षाला ६४ हजार ६५९ कोटी रु. मोजावे लागतात.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सुमारे ९७ हजार ७०६ कोटीच्या मागण्या मांडण्यात आल्या. ही महायुतीच्या काळातील सर्वात मोठी मागणी ठरली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, मेट्रो, एअर इंडिया इमारत खरेदी यासाठी मोठी तरतूद यामध्ये आहे. लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकारामुळे ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांना ९ हजार ६०५ कोटी रु. वाटले गेले. यामध्ये १४ हजार २९८ पुरुष लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेत आपले हात चांगलेच धुवून घेतले. या योजनेचा सर्वाधिक लाभ महायुतिमधील पक्षाना झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून मते टाकली व त्यांच्या जागामध्ये भरघोस वाढ झाली.
शिक्षण क्षेत्रावर सरकारचे बिलकुल नियंत्रण नाही. पेपर फु्टीमुळे विद्यार्थी त्रस्त असून हजारो विद्यार्थी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी निराश होऊन आत्महत्या देखील केल्या, पण सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही. जाने. ते मे २०२५ या पाच महिन्यात १ लाख ०६ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामध्ये ९२४ हत्या, ३ हजार ५०६ बलात्कार, इ. गुन्ह्याचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहविभाग आहे, त्यांच्या नागपूर जिल्ह्यात १० हजार ४२३ गुन्हे नोंदले गेले.कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस सरकार पार अपयशी ठरले.
राज्याची वाटचाल संक्रमण अवस्थेतून होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे पोपटपंची करणारे पोपट दरदिवशी आपली पाठ थोपटून घेत असतात.
जिल्हा परिषदेच्या शाळा एकीकडे बंद पडत आहेत, तर दुसरीकडे खाजगी शाळांचे प्रचंड पीक आले आहे. शिक्षणसम्राट
शिक्षणाच्या नावावर खोऱ्याने पैसा कमावत असताना ग्रामीण भागातील शाळांना वर्गखोल्या नाहीत, अंगणवाड्या झाडाखाली भरवण्यात येतात. पण फडणवीस हे ” मी परत येईन,” ” मी परत येईन,” असे कोकलत फिरत आहेत. एकेकाळी देशात क्रमांक १ वर असलेल्या राज्याला गुजरातने आता खालच्या क्रमांकावर ढकलले आहे, पण फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्याना त्याचे काहीही सोयरसुतक नाही.

