दीपक मोहिते,
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून ग्रामीण आरोग्याला मिळणार नवी दिशा,
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्राधान्य देणे आणि लोकसहभागातून निरोगी गावांची निर्मिती करणे, अशा उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव,’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बालविकास ) व्यंकटराव हुंडेकर आणि माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वैदेही माळवी उपस्थित होते. यावेळी सरपंच, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अशोक पाटील यांनी उत्तम आरोग्य हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. गावातील स्वच्छता, अंगणवाड्यांमधील शौचालयांची उपलब्धता व स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलन याकडे विशेष लक्ष देऊन सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. संतोष चौधरी यांनी स्वच्छ पिण्याचे पाणी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, जीवनशैलीतील आरोग्यदायी बदल आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले. व्यंकटराव हुंडेकर यांनी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यावर भर दिला.
संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, माता-बाल आरोग्य, संपूर्ण लसीकरण, कुपोषण निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा हे या अभियानाचे महत्त्वाचे घटक आहेत. क्षयरोग, कुष्ठरोग, मलेरिया, डेंग्यू व जलजन्य आजारांचे प्रतिबंध आणि नियंत्रण, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोग यांसारख्या आजारांची तपासणी, वेळेवर निदान आणि नियमित उपचार यांवर भर देण्यात येणार आहे. गर्भवती महिलांची लवकर नोंदणी, नियमित तपासण्या आणि संस्थात्मक प्रसूती यांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समित्या, महिला बचत गट, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून गावनिहाय आरोग्यविषयक कृती आराखडे तयार करून त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करून आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत निर्धारित निकषांनुसार ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यात येणार असून, एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय समितीमार्फत ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून घोषित करून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि आरोग्य संस्थांना पुरस्कार व प्रोत्साहन देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
या कार्यशाळेतून ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य, स्वच्छता, पोषण आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

