दीपक मोहिते,
वाहने वाढली, पण रस्ते तेवढेच, करदाते भोगताहेत मरणयातना…
वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर व डहाणू शहरासह लगत असलेल्या परिसरात गेल्या काही वर्षात प्रचंड नागरिकरण झाले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामध्ये पाणी, आरोग्य,शिक्षण, वाहतूककोंडी व अन्य पायाभुत सुविधाचा अभाव इ. चा समावेश आहे. आज या सर्व शहरामधील वाढती वाहतूककोंडी ही सर्वाधिक त्रासदायक ठरली आहे. रस्त्यामध्ये वाढ झाली नाही, मात्र वाहनाच्या संख्येचा वेलू मात्र गगनावर गेला आहे.
भाग १ : शहरनिहाय कोंडीचे हॉटस्पॉट
१) वसई,हॉटस्पॉट : वसई फाटा, भुईगाव फाटा, स्टेशन रोड
मूळ कारण : मुंबई-अहमदाबाद हायवे ( राष्ट्रीय महामार्ग – ४८ ) वरील जड वाहनांचा शहरात शिरकाव. सकाळी ८.०० ते ११.०० पर्यंत दर तासाला २ हजाराहून अधिक ट्रक व ट्रेलर्स वसई फाट्यावरून येजा करत असतात.
परिणाम : ५ कि.मी अंतराला किमान ४५ मिनिटे लागतात.
२ ) नालासोपारा :
हॉटस्पॉट : नालासोपारा ( पू. ) स्टेशन, तुळींज रोड, सेंट्रल पार्क रोड
मूळ कारण : लोकसंख्या घनता – १ चौ.कि.मी.मध्ये २५ हजार लोकांचा वावर. फुटपाथवर १००% अतिक्रमण, शेअर रिक्षा दर १० मीटरवर अंतरावर थांबणे,
३) विरार : हॉटस्पॉट : विरार फाटा, अर्नाळा सागरी किनारा रोड, विवा कॉलेज रोड,
मूळ कारण : पूर्व-पश्चिम जोडणारे दोन उड्डाणपूल. वाहनाची संख्या सतत वाढत असल्यामुळे उड्डाणपुलावर वाहनाच्या रांगा लागत असतात.
४ ) पालघर-बोईसर-डहाणू,
हॉटस्पॉट :
पालघर – मनोर रोड, बोईसर एमआयडीसी गेट, डहाणू – चारोटी नाका- मूळ कारण : एमआयडीसी मुळे अवजड वाहनांची सतत होणारी वर्दळ, पण रस्ता २ लेनचाच. चारोटी नाका टोलमुळे १ कि.मी.ची कोंडी रोजचीच.
भाग २ : १० वर्षांत काय बदलले ? आकडेवारी
२०१५ मध्ये वसई – विरार महानगरपालिक्स क्षेत्रामध्ये वाहनांची संख्या साडे तीन लाख होती, २०२५ मध्ये ती १० लाख इतकी झाली आहे वाहनाच्या संख्येत ३ पटीने वाढ.
रस्त्यांची लांबी फक्त १२% नी वाढली.
परिवहन सेवा : गरज ४०० बसची आहे,महानगरपालिकेकडे फक्त १०८ बस उपलब्ध आहेत. त्यामुळे ही परिवहन सेवा कुचकामी ठरली आहे.
ऑटो रिक्षा : अधिकृत परवाना ७ हजाराच्या आसपास,रस्त्यावर धावतात, सुमारे २० हजार रिक्षा,
भाग ३ : तज्ज्ञांनी सुचवलेले ८ ठोस उपाय – जे त्वरित करणे आवश्यक आहे.
उपाय १ : हायवे ट्रॅफिक वेगळा करा ( सर्वात महत्वाचा )
राष्ट्रीय महामार्ग – ४८ वर सातीवली ते वसई फाटा पर्यंत १२ कि.मी.चा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर आहे, पण काम रखडले आहे. हा कॉरीडर झाला तर शहरातील ६० % जड मालवाहतूक कमी होउ शकते.
उपाय २ : स्मार्ट ट्रॅफिक कंट्रोल रूम,
मीरा-भाईंदरच्या धर्तीवर वसई-विरारमध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्रत्येक सिग्नलला एआय कॅमेरा, चुकीच्या ठिकाणी थांबलेल्या रिक्षाचा ऑटोमॅटिक फोटो आणि दंड.
उपाय ३: स्टेशन परिसरात एकमार्ग लूप
नालासोपारा आणि वसई स्टेशनच्या १ कि.मी. परिसरात सकाळी ७.०० ते रात्री १०.०० पर्यंत एकमार्ग लूप नियोजन, हा प्रयोग ठाणे स्टेशन परिसरात यशस्वी झाला आहे.
उपाय ४: वसई विरार परिवहन आणि मेट्रो जोडणी,
परीवहनच्या २५० ई-बस तातडीने आणाव्यात.- मेट्रो लाईन १३ ( मीरा-भाईंदर ते विरार ) चे काम २०२८ पर्यंत पूर्ण करणे,मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या महत्वाच्या कामाला गती द्यावी.
उपाय ५ : पार्किंग धोरण,
विरार ( पश्चिम ) आणि नालासोपारा ( पूर्व ) येथे २ ठिकाणी पालिकेच्या जागेत मल्टी-लेव्हल पार्किंग आवश्यक,रस्त्यावर पार्किंग केल्यास दिवसाला ५०० रु. दंड, जसे मुंबईत आहे.
उपाय ६ : बोईसर-पालघरसाठी बायपास रोड,
बोईसर एमआयडीसी साठी स्वतंत्र मालवाहतूक कॉरिडॉर, ज्यामुळे गावातील रस्त्यावर ट्रक धावणार नाहीत.
उपाय ७ : अतिक्रमणावर ३६५ दिवस कारवाई करणे आवश्यक,
सध्या फक्त सण किंवा अति महत्वाच्या नेत्याच्या भेटीवेळी कारवाई होते. यासाठी कायमस्वरूपी वॉर्ड-निहाय पथक आणि नागरिकांना फोटो पाठवण्याची सुविधा तक्रारीसाठी,
उपाय ८ : शाळा-कंपनीच्या वेळा बदला,
पालघर-बोईसर एमआयडीसी मधील कंपन्यांची शिफ्ट सकाळी ९.०० वाजता सुरू होते आणि शाळाही त्याच वेळी. १ तासाचा फरक केल्यास सकाळची कोंडी ३०% कमी होईल.
निष्कर्ष:
वसई-विरार-पालघरची कोंडी ही फक्त रस्त्याची समस्या नाही, ती नियोजनाची समस्या आहे. १० लाख गाड्यांसाठी २०१० सालचे रस्ते आपण वापरत आहोत. जर हायवे वेगळा, सार्वजनिक वाहतूक भक्कम आणि पार्किंग धोरण कडक केले, तर पुढील २ वर्षांत ५० % वाहतूककोंडी कमी होऊ शकते.
पण यासंदर्भात प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे नागरिकांना सध्या रस्त्यावरून धड चालणे देखील शक्य होत नाही. केवळ पाहणी दौरे करून या ज्वलंत समस्या कधीही सुटू शकणार नाहीत, त्यासाठी इच्छाशक्ती व लोकांसाठी काहीतरी करायला हवे, अशाप्रकारची मानसिकता असायला हवी.

